कल्याण - एकदा ऐश आणि आरामाची सवय लागली की त्यातून बाहेर येणं अनेकांना जमत नाही. असंच काहीसं घडलंय मुंबईच्या अगदी बाजूला असलेल्या कल्याण शहरात. ही बातमी आहे एका सामान्य फुलवाल्याची ज्याला सवय लागली हार विकता विकता मुलींसोबत फ्लर्ट करायची आणि त्यांना फिरवायची. आता नस्ता कारभार करायचा म्हणजे पैशांची गरज लागणार. वरून मुलींना इम्प्रेस करण्यासाठी गाड्या हव्यात. म्हणून या पोराने शोधून काढली एक युक्ती. पण आता त्यामुळेच हा मुलगा जेलची हवा खातोय.   


हार विकता विकता मुलींशी बोलायची सवय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांनी एका बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. माधव भामरे असं या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन बाईक पोलिसांनी जप्त केल्यात. या चोरट्याने आणखी बाईक चोरी केल्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी तपास सुरु ठेवलाय. व्यवसायाने हार विक्रेता असलेल्या माधवला हार विकता विकता मुलींशी बोलायची सवय लागली. मुलींना आकर्षित करण्यासाठी त्याने महागड्या बाईक चोरून या बाईकवर त्यांना फिरवणे सुरू केले. नंतर या दुचाक्या तो विकून टाकायचा आणि त्याच पैशांमधून हौस मौज करायचा. अशीच एक चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या माधवला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे .


पोलिसांना लागली टीप आणि...


कल्याण डोंबिवलीत बाईक चोरीचे प्रमाण वाढल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले. बाईक चोरीच्या घटनांचा तपास करताना कल्याण महात्मा फुले पोलिसांना एक तरुण चोरीची दुचाकी विकण्यासाठी टिटवाळा गोवेली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत माधव भांबरे याला अटक केली. त्याच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी चोरी केलेल्या तीन बाईक जप्त केल्या. या चोरट्याविरोधात ठाणे, मुंबई, कल्याणमधील पोलिस ठाण्यांमध्ये बाईक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.