निखील चौकर, झी मीडिया, बोधेगाव-अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातील बोधेगावमध्ये बनावट मटक्याचा छापा दाखवून पोलिसांनी अडीच लाख लुटल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे ही बनावट कारवाई सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरच्या बोधेगावमधील रितिका मोबाईल गॅलरी. शेवगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस उपअधीक्षिका पौर्णिमा तावरे यांनी आपल्या पथकासह याच दुकानावर धाड टाकली. विशेष म्हणजे या पथकाला मटका व्यवसायावर धाड करायची होती. मात्र कारवाईत काहीच न मिळाल्याने हताश झालेल्या पोलिसांनी रितिका मोबाईल गॅलरीवर कारवाई केली. 


या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५१ हजाराची रोकड जप्त केली. मटका व्यवसाय धाडसत्रात ही रोकड सापडल्याचा बनाव पोलिसांनी केला. यांतही पोलिसांनी आणखी एक हेराफेरी केली. दुकानातून जप्त केलेल्या रकमेपैकी केवळ २९ हजार सापडल्याचे पोलिसांनी या गुन्ह्यात नमूद केले. तसंच मोबाईल गॅलरी चालकावर खोटा मटक्याचा गुन्हा दाखल केला असा आरोप आता होतोय. 


विशेष म्हणजे या कारवाईत अटकेत असलेल्या आरोपीवर याआधी कुठलेही गुन्हे दाखल नाही. त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या प्रकारावर बोलण्यास पौर्णिमा तावरे यांनी बोलण्यास नकार दिला. नंतर मात्र हे आरोप म्हणजे चांगल्या कामाची पावती असल्याचं त्यांनी म्हटलं. 


एकीकडे अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीसच आरोपीच्या पिंज-यात आहेत. हे प्रकरण ताजं असतानाच अहमदनगरच्या बोधेगावमध्ये मटका व्यवसाय धाडीचा बनाव करुन अडीच लाख रुपये लुटल्याचा पोलिसांवर आरोप होतोय. त्यामुळे पोलिसांची खाकी पुन्हा एकदा डागाळलीय.