पालखी सोहळा : संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते याही वर्षी पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना आधीच नोटीस बजावली आहे.
पुणे : संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते याही वर्षी पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मात्र या कार्यकर्त्यांकडून पालखी सोहळ्यात कुठल्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये अशा आशयाची नोटीस, पोलिसांनी त्यांना आधीच बजावली आहे. यावर्षी स्वत: संभाजी भिडे पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी संभबाजी भिडेंचे कार्यकर्ते हातात तलवारी घेऊन पालखीमध्ये घुसले होते.
दिंडीतील वारकऱ्यांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर वाद उद्भवला होता. याप्रकरणी संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांवर पुण्यातल्या डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यात आल्यानंतर, त्या मुक्कामस्थळी पोहोचेपर्यंत संभाजी भिडेंचे कार्यकर्ते या पालख्यांसोबत हातात तलवारी घेऊन चालतात. गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. दरम्यान आपले कार्यकर्ते यावर्षी कुठलंही शस्त्र बाळगणार नाहीत. तसंच कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचं, शिवप्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आलंय.