प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग: रायगड पोलीस दलातील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (५०) यांनी शुक्रवारी रात्री पोलीस मुख्यालयात अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, प्रशांत कणेरकर यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.


प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाले होते. अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर ते रजेवर गेले होते. १५ ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.


या घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्येचे  पाऊल का उचलले, हे अद्याप समजले नाही.