स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात 'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलीस हवालदार अब्दुल गणी, पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर देशभक्ती गीते स्पीकरवर वाजविण्यात आली होती. मात्र त्यानंतर 'खईके पान बनारस वाला' हे गाणं स्पीकरवर वाजवण्यात आलं. यावेळी एक सहाय्यक उपनिरीक्षक, एक पुरुष कर्मचारी तसंच दोन महिला कर्मचारी यांनी डान्स केला होता. 
व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना कारवाईला समोर जावे लागले.



त्याच पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने मोबाईलवर हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी पोलिसांचं कौतुक करत त्यांनीही आपल्यावरही भार काहीसा हलका करण्यासाठी डान्स केला तर चुकीचं नाही असं म्हटल होतं. 


निलंबनाची कारवाई कशासाठी?


पोलीस महासंचालक कार्यालतून गणवेशात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना या नियमाचं उल्लंघन केल्याची दखल वरिष्ठांनी घेतली. त्यानंतर चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 


पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी यावर बोलताना सांगितलं की, "वर्दीवर नृत्याचा ठेका धरणाऱ्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्दी घालून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तवणूक खपवून घेतल्या जाणार नाही. खाकी वर्दीची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य कुणीही करू नये अन्यथा कारवाई केल्या जाईल".