पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांच्या मागणीला यश, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
Maharashtra Police Bharti 2024: पोलिस भरती प्रक्रियेक एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलीये.
Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी घेतली जाणारी मैदानी चाचणी परीक्षा 19 जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. भरती प्रक्रियेला चार दिवस शिल्लक असताना उमेदवारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. पोलीस भरती आणि एसआरपीएफ भरतीतील मैदानी परिक्षेच्या तारखा एकत्र आल्याने अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून आलं. अशातच तारखा मागोमाग आल्याने उमेदवारांची मोठी पंचायत झाली होती. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर आता पोलिस प्रशासनाला खडबडून जाग आल्याचं पहायला मिळतंय.
रोहित पवार काय म्हणाले होते?
सध्या राज्यात सुरु असलेल्या पोलीस आणि एसआरपीएफ भरतीतील मैदानी परिक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय, असा मुद्दा रोहित पवार यांनी मांडला होता. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती आणि एसआरपीएफ भरतीच्या तारखा बदलाव्यात, अशी विनंती रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती.
उमेदवारांना विविध पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणजेच पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई अशा पदांसाठी अर्ज करता येतात. काही उमेदवारांना एकाच दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर रहावं लागत होतं. अशातच पोलिस विभागाने उमेदवारांना दिलासा दिलाय. पोलीस भरती 2022 -23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल, अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती पोलिस विभागाने दिली आहे.
दरम्यान, ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट घालण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी राज्यभर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल.