Raigad Rain :  किल्ले रायगडावर ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. किल्ल्याच्या पाय-यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहत आहेत. यामुळे पर्यटकांची तारांबळ उडालीये. रायगडावर फिरण्यासाठी गेलेले पर्यटक अडकले.  परतीच्या मार्गावर किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले. काहींनी संरक्षक कठड्यावर उभे राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून स्वत:चा जीव वाचवला. रविवारी असल्यानं रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या प्रमाणात होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांचे हाल झाले. यानंतर आता रायगडावर पर्यटकांना पर्वेश बंदी करण्यात आली आहे. रायगडाभोवती पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.   


रायगडावर  ढगफुटी सदृष्य पाऊस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी संध्याकाळी रायगडावर निर्माण झालेल्या ढगफुटी सदृष्य परिस्थितीनंतर प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे.  महाड प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  रायगडचा पायरी मार्ग आजपासून 31 जुलै पर्यंत बंद राहणार आहे. पायरी मार्गाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे 24 तास पोलिसांचा खडा पहारा ठेवला जाणार आहे. 


रायगडच्या महाड तालुक्यातील वाळण भागात ढगफुटीसदृश पाऊस बरसला. यामुळे काळ नदी दुथडी भरून वाहू लागली. तर सांदोशी, वारंगी, वाळणमध्ये रस्त्यांवरून ओढ्यांचं पाणी वाहू लागलं. तसंच वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. त्याचवेळी सांदोशी, बौद्धवाडी आणि वाघोली गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला. 


रायगडवाडी येथील धबधब्यातील कुंडात पोहण्यासाठी गेलेला तरुण  वाहून गेला


महाड तालुक्यात रायगडवाडी येथील धबधब्यातील कुंडात पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला मनोज शांताराम खोपकर असं त्याचे नाव आहे. त्‍याचा शोध अद्याप सुरू आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. रविवारी किल्‍ले रायगड परीसरात जोरदार पाऊस सुरू होता. त्‍याचवेळी मनोज गावाजवळच्‍या धबधब्‍यावर पोहायला गेला होता. अचानक पाण्‍याचा प्रवाह वाढला. अंदाज न आल्‍याने मनोज वाहून गेला.


धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा


रायगडमधील धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा अशा सूचना मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.  जिल्ह्यात हवामान खात्याने दिला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.  आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतला जिल्ह्यातील सद्य स्थितीचा आढावा घेतला.  जिल्ह्यात 103 गावे धोकादायक क्षेत्रात तर 9 गावे अतिधोकादायक क्षेत्रात, 11 गावे मध्यम धोकादायक दायक क्षेत्रात येतात. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेवून यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.