आतिश भोईर, कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांनी संयुक्त मोहीम कारवाई केली. वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांनी स्टेशन परिसरात धडक देत थेट कारवाई केली. सुमारे शंभरहून अधिक रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. महानगरपालिका अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्यामुळे फेरीवाल्यांवर पोलिसांनाच कारवाई करावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांची मुजोरी वाढत चालली असून बेशिस्त रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा उभी करत प्रवाशी घेत असल्याने मोठ्या प्रमाणार वाहतूक कोंडी निर्माण होते. रस्त्याच्या कडेला फेरिवाल्यानी आपले बस्तान मांडल्याने या वाहतूक कोंडीत भर पडते. याबाबत वाहतूक पोलीस तसेच शहर पोलिसांकडे तक्रारी वाढत चालल्याने वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सूरु केली. 


दोन दिवसापूर्वी पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात धडक देत कारवाई केली होती. मात्र त्यानंतर रिक्षा चालकांनी पुन्हा मुजोरी सूरु केली होती. या पार्श्वभूमीवर आज सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी पन्नासहून अधिक पोलीस कर्मचाऱ्याचा फौज फाटा घेऊन स्टेशन परिसरात कारवाईला सुरुवात केली. स्टेशनबाहेर मुख्य रस्त्यावर रिक्षाचालकांनी लावलेले सिमेंटचे दुभाजक हटवत रस्ता मोकळा करण्यात आला. आता या कारवाईत सातत्य ठेवणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पोवार यांनी म्हटलं आहे.