मुकुल कुलकर्णी, प्रतिनिधी, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या बॉश कंपनीतील अकरा कोटी रुपयाच्या स्पेअरपार्ट चोरी प्रकरणी राजकीय कनेक्शन समोर आलय. भाजपचा नगरसेवक, शिवेसेनेच्या नगरसेविकेचा पती आणि एका नगरसेविकेच्या पुत्राची या संदर्भात  चौकशी करण्यात आलीय. यात काय तथ्य बाहेर पडते याकडे नाशिककरांचे लक्ष लागलय.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातपूर औद्योगिक वसाहतीतली महत्त्वाची कंपनी म्हणजे बॉश कंपनी. इथे वाहनाचे आणि इतर डिशेल मशिनरीचे पार्ट्स बनतात. अशा स्पेअर पार्ट्सची चोरी होत असल्याचं उघड झालंय.


मागच्या आठवड्यात तब्बल १० कोटी ६६ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंत्राटदार छोटू चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी हे पार्ट चोरून रिमोल्ड करून पुन्हा विकल्याचं उघड झालंय. त्यांच्या चौकशीतून आता राजकीय लागेबांधे उघड होऊ लागलेत.


चोरीचं प्रकरण उघड होऊ नये म्हणून राजकीय मंडळींकडून दबाव येत असल्याची चर्चा होती. त्यानुसार भाजपचा नगरसेवक मुकेश सहाणे, शिवसेना नगरसेविकेचा पती बाळा दराडे, मनसेतून शिवसेनेत आलेल्या नगरसेविका रत्नमाला राणे यांचा मुलगा सचिन राणेची चौकशी करण्यात आली.


बुधवारी दराडेची चौकशी झाल्यावर गुरूवारी राणे आणि शहाणेची चौकशी झाली. चोरी झालेल्या मालाची पुढची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीतल्या काही अधिकारी कर्मचा-यांचेही हात काळे झाल्याचं समजतंय.


गेल्या काही वर्षात शहरात नवा उद्योग आलेला नाही. शहराचा औद्योगिक विकास खुंटलाय. मात्र आता अशा पद्धतीने चो-या होत असतील आणि त्याला राजकीय आशीर्वाद लाभत असतील तर नवे प्रकल्प शहरात येतीलच का असा सवाल आहे.