मनोज जरांगे यांच्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची कोंडी; गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी
एका बाजूला मनोज जरांगेंमुळे प्रस्थापित मराठा नेतृत्वासमोर आव्हान उभं ठाकलंय त्याचवेळी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांचीही कोंडीही झालीय.. जरांगेंच्या भूमिकेमुळे आमदारांना फटका बसतोय.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वपक्षीय पुढा-यांचीच कोंडी होतेय.. अनेक आमदारांनी जरांगेंची तक्रार पक्षनेतृत्वाकडे केल्याचं समजतंय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत अनेक गावात आमदार-खासदारांना गावबंदी करण्यात आलीय..अंबड तालुक्यातील भांबेरी ग्रामस्थांनी आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना भांबेरी ग्रामस्थांनी गावबंदी केलीय तर अशाच पद्धतीचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूल तालुक्यातल्या भायगाव गंगा गावातल्या नागरिकांनी घेतलाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदीचा निर्णय गावाच्या दर्शनीच लावण्यात आला आहे.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार-खासदारांना प्रवेशबंदी
मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार-खासदारांना प्रवेश न देण्याचा निर्णय अनेक गावांनी घेतला आहे. आमदार-खासदारांसह पुढा-यांचे गावातील दौरे रद्द झाले आहेत. आमदार, खासदारांचे राजकीय कार्यक्रम बंद करण्यात आलेत. ओबीसीतून मराठा आरक्षण दिल्यास वेगळाच रोष निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जातेय.
आमदार-खासदारांची गोची
मनोज जरांगे-पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला आठवडाही उरलेला नाही. सरकार आरक्षण देणार कसं याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही. त्यातच आरक्षण मिळेपर्यंत गावबंदीचा निर्णय अनेक गावांनी घेतलाय. त्यामुळे निवडणुका उंबरठ्यावर असताना आमदार-खासदारांची मात्र चांगलीच गोची झालेली पाहायला मिळतेय.
सराटीत झालेल्या सभेनंतर राज्य सरकारने अद्यापपर्यंत कुठलाही संपर्क केला नाही
अंतरवाली सराटीत झालेल्या सभेनंतर राज्य सरकारने अद्यापपर्यंत कुठलाही संपर्क केला नसल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. मात्र 40 दिवस आम्ही सरकारला बोलणार नाही, 40 दिवसानंतर काय करायचे ते आम्ही करू असा इशारा म्हणून जरांगेंनी दिलाय..येवल्यात जरांगेंच्या स्वागतावेळी क्रेन वरून पडून चार जण जखमी झाले होते. या जखमींची भेट घेण्यासाठी मध्यरात्री तीन वाजता जरांगे आपल्या कार्यकर्त्यांसह नाशिकच्या रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि मराठा आरक्षणासाठी कुणाचेही वेदना वाया जाऊ देणार नाही अस आश्वासन दिलं
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे यांची तोफ धडाडणार
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात 20 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणारेय. राजगुरुनगरमध्ये ही भव्य सभा होणारेय. शंभर एकर जागेवर ही सभा होणार असून या अनुषंगाने सर्व तयारी सुरू आहे. काल या जागेची पाहाणी करत असताना जमिनीवर रान होतं मात्र आज सभेसाठी ग्राऊंड तयार करण्याचं काम युध्दपातळीवर सुरू आहे. अजित पवारांच्या बालेकिल्लात ही जाहीर सभा होणार असल्याने जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. मराठा आरक्षणाबाबत जागृतीसाठी मनोज जरांगे यांची सोलापुरातल्या अकलूजमध्ये सभा होणार आहे. 21ऑक्टोबरला जरांगे सभेला संबोधित करतील. यासाठी मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सभास्थळाची पाहणी केली.