पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेसह मंत्रीपदीही पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकरांनाही विधानपरिषदेची लॉटरी लागणार आहे.
Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर आमदार होणार आहेत. इतकच नही तर त्यांना मंत्रीपदीही मिळणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे. काय आहे यामागील राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट.
विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारूण पराभव पत्करावा लागला. मात्र, आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी पंकजा मुंडेंचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार?
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना हरवलं. तर, बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणेंनी त्यांचा दारूण पराभव केला. ओबीसी-मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडं वळतील, असं भाजपला वाटतं.
पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित
दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक होणाराय. पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित मानली जातेय... विधानपरिषदेसाठी एकूण 10 नावं प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि जानकरांसह अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा समावेश असल्याचं समजतंय.. यापैकी 5 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून विधानपरिषदेची रणनीती भाजपनं आखलीय...