ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव :  धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे लाल माती व मॅटवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगात आला आहे . क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी नेत्याची झुंबर उरलेली असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातल्या मातीतल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळतय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर धाराशिवमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे जिल्ह्यातील स्थानिक आमदार, खासदार व इतर नेतेही फिरकले नाहीत. मात्र धाराशिव मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रंग शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील नामवंत मल्ल आखाड्यात रंगत आणत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून 5 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिव शहरात रंगला आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलात हा जंगी कुस्त्यांचा फड रंगत आहे. त्यासाठी राज्यभरातून 950 मल्ल व 550 पंच दाखल झाले आहेत. माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्ल संकुलात शड्डू ठोकून उतरले आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती तर अखेरच्या दिवशी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि स्पर्धेचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजक सुधीर पाटील यांनी दिली होती. या चार दिवसांत या नेत्यांव्यतिरिक्त खासादर सुप्रिया सुळे, खासादर छत्रपती उदयनराजे, माजी खासादर संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, तुळजाभवानी देवीचे महंत यांसह विविध पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचेही म्हटलं जात होतं. मात्र याकडे आता राजकीय नेते मंडळींनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.


आज तिसऱ्या दिवशी शिवराज राक्षे, बाला रफिक, विशाल बनकर या पैलवान यांनी विजय मिळवीत मैदान गाजविलं आहे. लाल माती व मॅट या 5 मैदानावर कुस्तीची दंगल सुरु असल्याने ही कुस्ती पाहण्यासाठी धाराशिव मधील नागरिक देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी सोमवारी संध्याकाळी चार वाजता अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे सोमवारी महाराष्ट्र केसरी कोण होणार हे ठरणार आहे.