नितेश महाजन, झी मीडिया, जालना : यंदा वेगवेगळ्या उद्योग धंद्यांना कोरोनाच्या महामारीचा फटका बसलाय. शेती क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेलं नाही. कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका जालना जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन काळात फळं विक्रीसाठी तयार असूनही मालाची वाहतूक बंद असल्याने झाडांना लगडलेले डाळिंब गळून पडले आहेत. फळांचा दर्जाही खराब झालाय. त्यामुळे डाळिंब व्यापारी थेट बांधावरुन 100 रुपये प्रती कॅरेट प्रमाणे डाळिंबाची जागेवरुन खरेदी करतायेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा जगभरातल्या कोरोना व्हायरसमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी रोजच्या खर्चालाही महाग झाला आहे. कोरोनाने यंदा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर थेट जुलै-ऑगस्ट महिन्यातच संक्रांत आणलीय. लॉकडाऊन काळात राज्यभरात वाहतूक बंद होती, याचा फटका आंबिया बहार धरणाऱ्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन काळात वाहतूक बंद असल्याने एकही व्यापारी बागेत डाळिंब खरेदीसाठी फिरकला नाही. परीणामी जून-जुलै महिन्यात पिकलेल्या डाळिंबाला झाडावरच तडे गेले. अनेक फळं पिकून जमिनीवर गळून पडले. तर इतर सर्व डागाळले. त्यामुळे बांधावर खरेदी झालेल्या या डाळिंबाच्या 22 किलोच्या कॅरेटचा आजचा बाजारभाव फक्त 100 रुपये प्रति कॅरेट आहे 


जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वायाळ सावरगावच्या डाळिंब उत्पादक वायाळ कुटुंबाची 3 एकरावर भगवा जातीच्या डाळिंबाची बाग आहे. पण यंदा सुरुवातीला चांगला दर्जा असूनही माल विकला गेला नाही. त्यामुळे 3 एकरात माल पिकून जमिनीवर सडलाय. अवघ्या बागेत डाळिंबाचा खच पडलाय. झाडावर लगडलेले डाळिंब वेळेत तोडणी न झाल्याने काळे पडलेत. त्यामुळे लॉकडाऊन उघडूनही एकही व्यापारी चांगल्या भावाने माल खरेदीला तयार नाही. कारण मालाचा दर्जा खालावलाय.


दरवर्षी डाळिंबाच्या आंबे बहाराला चांगला भाव मिळतो.70 ते 75 रुपये दराने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरुन गेल्या वर्षी डाळिंब खरेदी केले. बागेला बहार धरल्यापासून फळं विक्रीसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिन्यांचा अवधी लागतो. त्यावर शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च होतो. पण यंदा वेळेत तोडणी झाली नाही त्यामुळे शेतकरी खाईत गेलाय. जिल्ह्यात हजारो हेक्टरवर डाळिंबाची लागवड झालेलीय. त्या सर्वच शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे शेतीत पिकूनही विकलं गेलं नाही अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.