मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) संशयाच्या फेर्‍यात असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलं आहे. राठोड हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३ तारखेला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीला उपस्थिती होते. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरण समोर आल्यापासून ते मंत्रालयातही फिरकलेले नसून नॉट रिचेबल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राठोड कुठे आहेत याची कुणाला माहिती  नाही. याप्रकरणात विरोधक भाजपने राठोड यांना लक्ष्य केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राठोड आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र  या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बैठकीला गैरहजर राहण्याचीच दाट शक्यता आहे.


 पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले वनमंत्री संजय राठोड अखेर मौन सोडणार आहेत. येत्या गुरुवारी 18 फेब्रुवारीला बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर, संजय राठोड येणार आहेत. तिथे ते बोलतील अशी माहिती, बंजारा समाजाचे गुरू सुनील महाराज यांनी दिली आहे. 


आठ दिवस उलटून गेले तरी संजय राठोड यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे राठोड सध्या नॉट रिचेबल आहेत. ते नेमकं कुठं गायब झालेत? अशी चर्चा आहे. टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या 22 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र ते दडून बसलेत.त्यांचा ठावठिकाणा कुणालाही नाही. ते नेमके आहेत कुठे, याचा शोध घेण्यासाठी झी २४ तासनं आधी त्यांचं यवतमाळचं घर गाठलं.


वनमंत्री संजय राठोड यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यावर सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईत आल्यानंतर ते जिथं राहतात, त्या ईरॉस टॉकिजजवळच्या इमारतीतील फ्लॅटवर झी 24 तासची टीम पोहोचली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव गोवण्यात आल्यापासून संजय राठोड मंत्रालयातील त्यांच्या दालनात देखील आलेले नाहीत.