पूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाण
IAS Puja Khedkar Row: पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात फरार झाल्याची माहिती समोर येतंय.
IAS Puja Khedkar Row: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणी तिला अटक होऊ शकते. मात्र नॉट रिचेबल असलेली पूजा सध्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर परदेशात पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परदेशात रवाना होणार असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. पूजा खेडकर खरंच परदेशात पसार झालीये की भारतातच आहे? याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये.
युपीएससीने पूजा खेडकर हिला दोषी ठरवलं होतं. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने नागरी सेवा परीक्षा-2022 (CSE-2022) ची तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली आणि तिला भविष्यातील यूपीएससी परीक्षा देण्यावर बंदी घातली आहे.
युपीएससीने पूजा खेडकर हिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर तिने कोर्टात अटकपू्र्व जामीनासाठी याचिका केली होती. पतियाळा कोर्टात याबाबत गुरुवारी सुनावणी पार पडली. दिल्ली पटियाला हाऊस कोर्टानं जामीनअर्ज फेटाळला आहे. त्यामुळं पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून पूजा नॉट रिचेबल आहे. ती परदेशात फरार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पूजा खेडकर यांनी नाव बदलून दिल्या परीक्षा
IAS होण्यासाठी पूजा खेडकर आणि तिच्या आई-वडिलांनी वेळोवेळी नवीन नावं धारण केल्याचं य़ुपीएससीच्या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिलीय. त्यामुळे पूजा खेडकर बरोबरच तिच्या आई-वडिलांवरदेखील कारवाई होण्याची शक्यता आहे. 2012 पासून पुजा खेडकर आणि तिचे आई-वडिल वेगवेगळ्या नावांनी वावरत आलेत. त्यामुळे यंत्रणेला वेळोवेळी फसवण्यात ते यशस्वी ठरले. या वेगवेगळ्या नावांचा उपयोग पुजा खेडकरने युपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी, नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलाय.