रवींद्र कांबळे, सांगली :  कोरोनामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक परिणामांची झळ सर्वांनाच बसत आहे. पण या लॉकडाऊनचे काही चांगले परिणामही दिसून येत आहेत. सांगलीत कोरोना लॉकडाऊनचे काही सकारात्मक परिणाम दिसून आले. विशेष म्हणजे जगभरात कोरोनामुळे जगभरात मृत्युचं प्रमाण वाढलं असताना सांगलीत मात्र मृत्युचा दर नेहमीपेक्षा बराच कमी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीच्या इस्लामपुरात कोरोनाचे रुग्ण आढळले आणि सांगली जिल्हा चर्चेत आला. त्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत गेली आणि ती २६ वर पोहचली. आनंदाची बाब म्हणजे सांगलीतील २६ पैकी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करण्यात आली. त्याचा फायदा कोरोना रोखण्यात तर झालाच, पण अन्य बाबतीतही सांगलीकरांना याचा फायदा झाला.


लॉकडाऊनच्या काळात सांगलीत अपघात, खून, आत्महत्यांचं प्रमाणही कमी झालं. दर महिना असलेलं मृत्युचं प्रमाण निम्म्यावर आलं. अपघाती मृत्यू कमी झाले आणि आजारही कमी झाले. शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात एरवी असलेली गर्दी आता दिसत नाही. खून आणि आत्महत्यांचं प्रमाणही नेहमीपेक्षा खूपच कमी झालं.


लॉकडाऊनच्या आधी म्हणजे १ मार्च ते २० मार्च या काळात सांगली शहरात विविध कारणांमुळे ३३० लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण निम्म्यानं घटून ते १०४ वर आलं. जन्म-मृत्यू नोंद उपनिबंधक किरण माळी यांच्याकडील ही आकडेवारी सांगलीतील घटलेला मृत्युदर अधोरेखित करते. ‘सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत रोज ८ ते १० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते, ते आता २ ते ४ इतकं कमी झालं आहे,’ अशी माहिती स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी उमेश कुदळे यांनी दिली.


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आजार कमी होण्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत आहेत.


लॉकडाऊनमुळे नेमके काय झाले?


स्वच्छता – वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग यामुळे स्वच्छता वाढली. शिवाय हवेतून पसरणाऱ्या जंतूपासून लोक दूर राहिले. संसर्ग आणि प्रदूषित हवेमुळे होणारे आजार कमी झाले असावेत.


विश्रांती – सतत कामामुळे आणि धावपळीमुळे येणारा शारीरिक आणि मानसिक ताण कमी झाला. पुरेशी विश्रांती आणि झोप मिळू लागली.


ताणतणाव – बहुसंख्या आजाराची कारणं ताणतणावाशी संबंधित असतात. लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांशी संवाद झाला तर मित्रमंडळीशी फोनवरून संपर्क झाला. त्यामुळे ताण कमी झाला.


आहार – लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद आहेत. त्यामुळे बाहेरील फास्ट फूड आणि चमचमीत मसालेदार, तेलकट पदार्ध, याशिवाय रस्त्यावरील गाड्यांवरचं खाणं यापासून सुटका झाली. घरचे आरोग्यदायी खाणे सुरु झाल्यानं आहार चांगला राहिला.


प्रदूषण – रस्त्यावर वाहने नाहीत. कारखाने बंद आहेत. त्यामुळे हवा, पाणी आणि आवाजाच्या प्रदूषणातून निर्माण होणारे आजार थांबले आहेत.


व्यसने – दारु तसेच अन्य दुकाने बंद असल्याने सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे. त्यातून उद्भवणारे आजारही कमी झाले आहेत.


 



दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील गुन्ह्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटलं आहे. लॉकडाऊनच्या आधी म्हणजे १ मार्च ते २२ मार्च या काळात ३२५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यात दोन खून, ४२ अपघात, महिलाविषयक ३१ गुन्हे आणि अन्य गुन्हे नोंद झाले होते. मात्र २३ मार्च ते १७ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या काळात १२७ गुन्हे दाखल झालेत. यात १ खून १६ अपघात आणि महिला विषयक ५ गुन्ह्यांचा समावेश आहे. नागरिक घरात आहेत आणि पोलीस रस्त्यावर. त्यामुळे गुन्हे आणि मृत्युचं प्रमाण कमी झाले आहे