म्हाडाचं घर घेणाऱ्यांना थोडं थांबावं लागणार, कोकण मंडळाकडून घरांची जुळवाजुळव
MHADA`s Konkan Mandal lottery : म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज भरणार असाल तर अजून थोडं थांबावं लागणार आहे. कारण...
मुंबई : MHADA's Konkan Mandal lottery : म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज भरणार असाल तर अजून थोडं थांबावं लागणार आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
कोकण मंडळाने सोडतीची तयारी, घरांची जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र, सोडतीतील घरांची वाढलेली संख्या आणि राज्य सरकारने उत्पन्न मर्यादेत केलेले बदल यांमुळे ही सोडत प्रक्रिया सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. या सोडतीतील घरांची संख्या दोन हजारांहून अधिक असणार आहे.
म्हाडा सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ
मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी सामान्यांच्या बजेटमध्ये परवडेल अशा म्हाडाच्या घरांना लोकांची पहिली पसंती असते. पण आता म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांची घरे श्रीमंताकडे जाण्याची शक्यता अधिक आहे.
म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली होती. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येते. आतापर्यंत अत्यल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत, अल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत, मध्यम गटासाठी प्रति महिना 50 हजार ते 75 रुपये आणि उच्च गटासाठी रुपये 75 हजाराच्या पुढे अशी उत्पन्न मर्यादा होती. आता यात बदल करत ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली आहे.
नव्या बदलानुसार आता उत्पन्न मर्यादा
अत्यल्प गट । वार्षिक 6,00,000 रुपये
अल्प गट । वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
मध्यम गट । वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
उच्च गट । वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये