Mumbai Road Potholes : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुंबईकरांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, फक्त पावसाळ्यातच नाही उन्हाळा आणि हिवाळ्यात देखील मुंबईतील रस्त्यांची तीच अवस्था असते. या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो. तर काहींना दुखापतीचा सामना करावा लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पाहून मराठी कलाकार देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोस्ट शेअर करून रस्त्यांवरील खड्डयांबाबत संताप देखील व्यक्त केला आहे. ज्यामध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सुरभी भावे यांच्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 


पुष्कर जोगच्या पोस्टमध्ये काय?


सामाजिक मुद्द्यांवर कायमच मनमोकळ्या मनाने अभिनेता पुष्कर जोग त्याचे मत मांडत असतो. नुकतेच त्याने मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत एक पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, दरवर्षी तेच तेच..रस्त्यांवर खड्डे आहेत की आपण सगळे खड्ड्यात...ह्याचा ही सर्व्हे झाला पाहिजे ना? नाही नाही आपण काहीच बोलायचं नाही...आपण फक्त अवाढव्य टॅक्सेस भरत राहियचे...#जोगबोलणार माणसांचा, लहान मुलांचा आणि महिलांचा जीव महत्वाचा आहे की नाही? असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. 



पुष्करने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठीमधून देखील अभिनेता लोकप्रिय झाला आहे. जबरदस्त चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 


सुरभी भावेची पोस्ट चर्चेत


मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकच नाही तर कलाकार देखील आपली मतं मांडताना दिसत आहे. मराठी अभिनेत्री सुरभी भावे खड्ड्यांबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिने हा व्हिडीओ रिक्षातून प्रवास करताना शूट केला आहे.  या व्हिडीमध्ये अभिनेत्रीने म्हटले आहे की, नमस्कार मी अभिनेत्री सुरभी भावे. असं म्हणतात की इलेक्शन होईपर्यंत, मतं मिळेपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा आहे. पण इलेक्शन झालं, निवडून आले की असं म्हणायचं, मतदार गेले खड्ड्यात. आपण सामान्य नागरिक असं मजेने म्हणतो ते कदाचित सगळ्याच राजकारण्यांनी खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. असं म्हणायला हरकत नाही. मी असं का म्हणतेय हे मी तुम्हाला सांगते बघा. शूटिंगसाठी मी ठाणे ते मड असा प्रवास करत असते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मडच्या रस्त्यावर जे खड्डे बघितले. त्यामुळे या प्रवासात माझी पाठ खूप दुखतेय. त्यामुळे जे रोज प्रवास करतात त्यांना या खड्ड्यांमधून रस्ता शोधणं किती कठीण जात असेल? माझी विनंती आहे. तुम्हाला आमचं दु: ख नक्की काय आहे हे कळणार नाही. तुम्ही स्वत: ला सामान्य जनतेचे सेवक म्हणत असाल तर सेवकासारखं तुम्ही खरं खरं वागा. असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.