चाकरमान्यांनो.... गणेशोत्सवासाठी जाताना `हे` खड्डे पहाल तर कोकणात जाणं टाळाल
गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आता थोड्याच दिवसांत निघतील. पण त्यांचा हा उत्साह किती दिवस राहील हा प्रश्नच आहे. कारण अपूर्ण असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात.
Mumbai Goa Highway : अवघ्या काही दिवसांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आता थोड्याच दिवसांत निघतील. पण त्यांचा हा उत्साह किती दिवस राहील हा प्रश्नच आहे. कारण अपूर्ण असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. यामुळे कोकणवासीयांना या मार्गावरून प्रवास करताना सर्वात जास्त अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेले काही वर्ष दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची व्यथा, महामार्गाचा वनवास काही केल्या संपत नाही. दरम्यान दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे खड्डे तातडीने बुजवणं गरजेचं आहे. या खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग घटलाय. तासन तास वाहनांच्या रांगा लागत आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही कमालीची वाढलीय. मुंबई गोवा हायवेची दूरवस्था झालीय. याकडे वारंवार आवाज उठवूनही रस्ता दुरूस्त केला जात नाहीये.एकीकडे रस्ता रूंदीकरणाचं काम संथगतीने सुरू आहे. त्यातच पावसामुळे रस्त्याची अक्षरशः रांगोळी झालीय.
याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा विषय विधानसभेमध्ये मांडला. कोकणातील सर्वच आमदारांनी या विषयावरुन सरकारला प्रश्न विचारमाऱ्या जाधव यांची पाठराखण केली. अखेर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलं. मात्र त्याहूनही महत्वाची घोषणा त्यांनी सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली.