पुणे : Power outage in Pune district :महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी आज बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी सहा वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. (Power outage in Pune and other parts of the district)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय दाट धुके आणि दव यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बत्तीगुल झाली आहे. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.



महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली आहे. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.