फक्त शरीरसुखासाठी प्रदीप कुरुलकरने झाराला सर्व सांगितलं, राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची गुपितं पुरवली...
डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरूलकरनं शरीरसुखासाठी पाकिस्तानी महिला एजंटला क्षेपणास्त्रांची गुपितं पुरवली असल्यांच समोर आलं आहे. आरोपपत्रात धक्कादायक माहिती उघड झाली असून राफेलपासून ब्राम्होसपर्यंत सर्व माहिती आयएसआय एजंटला दिली.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकलेल्या डीआरडीओच्या प्रदीप कुरुलकरच्या (Pradeep Kurulkar) व्हॉट्स अॅप चॅटमधून धक्कादायक खुलासे झालेत. फक्त शरीरसुखासाठी कुरुलकरने झारा या पाकिस्तानी एजंटसोबत (Pakistani Agent) राफेल विमानांपासून ते अग्नी, ब्राम्होस क्षेपणास्त्राची गुपितं फोडल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर मध्यम पल्ल्याचं मानवरहीत हवाई क्षेपणास्त्र रुस्तम, मानवरहित कॉम्बॅट एअर व्हेइकल्स, DRDO चा ड्रोन प्रकल्प अशा अनेक संवेदनशील प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण केल्याचंही उघड झालंय. व्हॉट्स अॅप तसंच इन्स्ट्राग्राम, बिंग चॅट आणि क्लाऊड चॅटच्या माध्यमातून कुरुलकरने पाकिस्तानी एजंटला ही संवेदनशील माहिती पुरवली
शरीरसुखासाठी कुरुलकरने गुपितं फोडली
पहिल्या चॅटमध्ये सरफेस टू एअर मिसाईलबाबत माहिती पुरवली, दुसऱ्या चॅटमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राबाबतची गुपितं पुरवली, संरक्षण प्रकल्पात वापरण्यात आलेल्या साहित्याच्या रचनेची माहिती, क्षेपणास्त्र, आकाश लॉन्चर आणि नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजची माहिती दिली. डीआरडीओशी संबंधित अनेक लोकांची आणि ड्यूटी चार्टची माहिती पुरवली. याशिवाय मिसाइल लाँचर, मेटियर क्षेपणास्त्र, आकाश आणि ॲस्ट्रा मिसाईलबाबतची माहितीही लीक करण्यात आली आहे. एटीएसने हे सर्व चॅटिंग विशेष न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रासोबत जोडलंय.
वेगवेगळ्या अॅपचा वापर
डी आर डी ओचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला व्हॉटस्अप (WhatsApp Chat), इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून सर्व माहिती पुरवली. दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या तपासातून समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर कुरुलकर यांनी वेगवेगळ्या सोशल ॲप्सचा वापर करून संवेदनशील माहिती दिली. कुरुलकर आणि झारा दासगुप्ता हे दोघे ही व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात होते. त्यासोबतच ते बिंग चॅट आणि क्लाऊड चॅट या अप्लिकेशनवरून बोलत होते. दरम्यान, सरकारी पक्षाने कुरूलकर यांची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याच्या मागणीसंदर्भात कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली आहे.
कुरुलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात कुरुलकर यांच्याविरोधात असंख्य आरोप लावले आहेत ३० जून रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात एटीएसने आरोपपत्र दाखल केलं आहे. पाकिस्तानी एजंटने कुरुलकर यांना व्हिडीओ कॉल करण्यासाठी त्यांच्या फोनमध्ये “bingechat.net” आणि “cloudchat.net” असे ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं होतं, हेही आरोपपत्रात नमूद केलं आहे.