प्रफुल्ल पवार / अलिबाग : Alibaug Police : रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि  प्रदेश युवक कॉंग्रेसचा सरचिटणीस अ‍ॅड. उमेश ठाकूर याच्यासह त्‍याच्‍या दोन साथीदारांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. बदनामी करण्‍याच्‍या हेतूने बनावट फेसबुक अकाऊंटवरुन (facebook fake account) महिलेला अश्‍लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदार महिलाही उमेश ठाकूर यांच्‍या कटात सहभागी असल्याचे उघड झाले आहे. (Pradesh Youth Congress General Secretary Adv. Umesh Thakur and his two accomplices arrested at Alibaug)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्‍या अवैध रेती व्‍यवसायाबाबत तक्रारी करणाऱ्याचा काटा काढण्‍यासाठी त्‍याची बदनामी करण्‍याच्‍या हेतूने त्‍याच्‍या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. या फेक सोशल अकाऊंटवरुन महिलेला अश्‍लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठविण्यात येत होते. याप्रकरणी प्रदेश युवक कॉंग्रेसचा सरचिटणीस अ‍ॅड. उमेश ठाकूर याला अलिबाग पोलीसांनी अटक केली आहे. 


उमेश ठाकूर रुग्‍णालयात दाखल असून त्‍याची मेडीकल कस्‍टडी घेण्‍यात आली  आहे. उमेश ठाकूर हा रेतीचा व्‍यवसाय करत आहे. धरमतर खाडीतील त्‍यांच्‍या अवैध रेती उत्‍खननासंदर्भात पेण तालुक्‍यातील कोलेटी येथील काशिनाथ ठाकूर वेगवेगळया कार्यालयात तक्रारी करत असत. त्‍यामुळे उमेश ठाकूर यांना व्‍यवसायात मोठे नुकसान होत होते. आपल्‍या विरोधातील तक्रारीने उमेश ठाकूर हैराण झाले होते. त्‍यांनी काशीनाथ ठाकूर यांचा काटा काढण्‍याचा प्‍लान आखला .



शुभम गुंजाळ यांच्‍या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्‍या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आणि आपल्‍याच ओळखीतील एका महिलेला त्‍यावरुन अश्‍लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवले.
या व्हिडिओ आणि मेसेजच्‍या आधारे त्या महिलेने काशीनाथ ठाकूर यांच्‍या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली. त्‍यावरुन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्‍हा दाखल केला. 


तपास करणारे अंमलदार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेण्‍याचे ठरवले. सायबर सेलने केलेल्‍या तपासात धक्‍कादायक बाब समोर आली. यात शुभम गुंजाळ हा सहभागी असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्‍याची सखोल चौकशी केली असता उमेश ठाकूर हा या कटाचा सुत्रधार असल्‍याचे समोर आले. महत्‍वाचे म्‍हणजे ज्‍या महिलेने तक्रार दिली होती, ती महिला या कटात सहभागी होती.


 पोलिसांनी अ‍ॅड. उमेश ठाकूर , शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही अटक केली आहे. प्रकृती बिघडल्‍याच्‍या कारणावरुन उमेश ठाकूर रुग्‍णालयात दाखल झाला आहे. त्‍याची मेडीकल कस्‍टडी घेण्‍यात आली आहे. तर दोघांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.