Praful Patel Statement On Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याबद्दल बोलताना शरद पवार यांनी भावनिक वक्तव्य केलं होतं. एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी 2004 सालचा किस्सा सांगितला. आत्ता नव्हे तर 2004 पासून प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास आग्रही होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजपमध्ये जा, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रफुल्ल पटेल म्हणतात...


होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. 


हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे, असं ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केलंय.



शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?


दरम्यान, 2004 मध्ये अजित पवार तेव्हा अनुभवाने नवीन होते. तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती. पण त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. त्याचा परिणाम स्थिर सरकार देण्यात आम्ही अपयशी ठरलो असतो. त्यामुळे आम्ही एकमताने हा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. भाजपने इंडिया शायनिंगचा प्रचार सुरु केला, तेव्हा प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाण्यास आग्रही होते. मात्र मी त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर मी त्यांना सांगितलं की, तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा, असं म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.