गुजरातमधून आणलेल्या ईव्हीएम मशीनवर पटेल-पटोलेंचा आक्षेप
महाराष्ट्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत, तरी देखील भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी,
भंडारा : राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुजरातहून महाराष्ट्राच्या पोटनिवडणुकीसाठी आणलेल्या, ईव्हीएम मशीन्सवर आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत, तरी देखील भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी, निवडणूक आयोगाने गुजरातच्या सुरतमधून ईव्हीएममशीन्स का मागवले, असा सवाल उपस्थित केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यावर म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेच्या केवळ २ जागांसाठी आणि विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रात ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध असताना, गुजरातच्या सुरतमधून मशीन का मागवण्यात येत आहेत.
या सर्व प्रकार संशयास्पद आहे, पोटनिवडणूक पारदर्शकपणे व्हावी, तसेच निवडणुकीविषयी विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या मशीन्सची तपासणी होणे गरजेचे आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १० टक्के मशीन या रॅण्डम पद्धतीने तपासण्याची मागणी केली आहे. तसेच यावेळी उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने सभांना उशीरापर्यंत परवानगी द्यावी, तसेच मतदानाची वेळ देखील संध्याकाळपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.