सतीश मोहिते, झी मिडिया, नांदेड : पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात असल्याची चर्चा राजकारणात(Maharashtra Politics) होत असते. निवडणुकांमध्ये मतदारांना पैशांचे अमिष दाखवले जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यावरुनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट जनतेवरच गंभीर आरोप केला आहे. लोक पैसे घेऊन मतदान करत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आहे(Latest Political Update). 


आपली किंमत आपण हरवतोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 हजार रुपये घेऊन लोक आपले मत विकतात. आपली किंमत आपण हरवतोय. जिथे विचारांना महत्त्व नाही तिथे नीतिमत्ता नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  पैसे घेऊन मतदान केले जाते. मग साडेचार वर्ष सहन करावे लागते असं प्रकाश आंबेडकर मतदारांना उद्देशून म्हणाले. 


राहुल गांधी यांची पदयात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा. भारत जोडायचा असेल तर जाती व्यवस्थेच्या अंतासाठी आंदोलन करा. कोण या जातीचा कोण त्या जातीचा, कोण याला पाडेल कोण त्याला पाडेल या भानगडीत जाता कामा नये. आपल्याला जाती अंताचा लढा लढायचा आहे अस आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.


राहुल गांधींच्या पदयात्रेवर टीका


राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून काय होणार? तुटले असेल तर काही जोडता येतं. हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून देश मुक्त करायचा असेल तर जाती अंतातासाठी आंदोलन उभारा मग देश जोडला जाईल असा सल्ला वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना दिला. 


शनिवारी बौद्ध महासभेतर्फे नांदेडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकर बोलत होते. राहुल गांधी यांची पदयात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, हवा आहे तोपर्यंत आहे, हा मार्च संपला की बुडबुडा संपला असेही आंबेडकर म्हणाले.


सत्तासंघर्षावर प्रकाश आंबेडकर यांचे भाष्य


प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरही भाष्य केले. काँग्रेस पक्षामधील नैतिकता संपली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचे 16 जण निलंबित झाले आहेत.  असे असले तरी नांदेडकर आणि लातूरकर दोघे जण देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला, मस्का लावायला तयार आहेत असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.  काँग्रेसवाल्यांकडे आता काही राहिले नाही. जे आहे ते वाचवण्याची मानसिकता त्यांची आहे. 


RSS वर प्रकाश आंबेडकर यांची टीका


प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस वरही टीका केली. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणतात की, अखंड भारत बनला पाहिजे. अफगाणिस्तान पासून कर्गीस्तान पर्यंत भारत बनला पाहिजे. पण, ते देश स्वतंत्र देश आहेत. ते तुमची गुलामी का करतील. असे वक्तव्य करून अशांतता पसरवली जातेय. असे झाले तर गुलामगिरी करण्यापेक्षा तेथील लोक बॉम्ब स्फोट करणार नाहीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  आर एस एस ने मनुस्मृती चे दहन करावे आणि जातीय आधारावर असलेले पुरोहित यांच्यावर बंदी आणावी तर आम्हीही आर एस एस बरोबर येऊ असे आंबेडकर म्हणाले.