दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ प्रणिती शिंदे काबीज करणार?
सोलापूर लोकसभा मतदारसंघ.. गेले दोन टर्म हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.. आता याच मतदारसंघातून काँग्रेस प्रणिती शिंदेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
Praniti Shinde : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जातंय. दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेला सोलापूर मतदारसंघ प्रणिती शिंदेंच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला काबीज करायचाय आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून प्रणिती शिंदेंचं नाव समोर आलंय प्रणिती शिंदेंच्या नावाला त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनीही दुजोरा दिलाय तर आपण सज्ज असल्याचं अप्रत्यक्षपणे प्रणितींनी म्हटल आहे.
सोलापुरात प्रणिती विरुद्ध भाजपचा 'राम'?
भाजपनंही उमेदवाराची चाचपणी सुरु केलीय.. अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर करायचा ही आतापर्यंत भाजपची सोलापूरसाठी स्ट्रॅटेजी राहिलीय. मात्र सध्या भाजपकडून माळशिरसचे युवा आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्म, हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण ते आमदार असा राम सातपुतेंचा प्रवास राहिलाय. याच प्रतिमेचा फायदा भाजपला करुन घ्यायची रणनीती आखली जातेय अशी चर्चा आहे.
प्रणितींच्या नावाची चर्चा का?
सोलापूर मतदारसंघात 2 टर्म भाजपचा खासदार निवडून आला आहे. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत.
एकेकाळी सोलापूर काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. 2014 पासून शिवसेना-भाजप युतीनं जिल्ह्यावर पकड मिळवली होती. मात्र, यानंतर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा सलग दोन वेळा पराभव केला.
प्रणितींमुळे भाजपची हॅटट्रीक भंगणार?
सोलापूर म्हटलं की माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचं नाव डोळ्यासमोर येतं. मात्र गेलं दशकभर जिल्ह्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं आपली पकड मजबूत केलीय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घ्यायचाच असा चंग काँग्रेसनं बांधलाय. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून प्रणिती शिंदेंचं नाव समोर आल आहे.