पौर्णिमेला गर्भधारणा, विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण
एका खाजगी कंपनीत मॅनेजर असलेल्या पतीने तर तिच्या पोटावरही लाथा मारल्या...
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : एकविसावं शतक आणि विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी समाजातल्या अनेक घटकांवर बुरसटलेल्या विचारांचा पगडा आजही खोलवर रुजलेलाच आहे. पिंपरी चिंचवडच्या थेरगावमध्ये अंधश्रद्धेतून अशीच संतापजनक घटना घडलीय.
पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरातल्या कैलास नगरमधल्या एका बंद खोलीत १५ दिवसांपूर्वी एक कुटुंब राहायला आलं. या कुटुंबातील सून गर्भवती राहिल्याने सर्वच जण सुरुवातीला आनंदित होते. पण अंधश्रद्धेने पछाडलेल्या या कुटुंबियांना गर्भधारणा पौर्णिमेला झाल्याचं समजलं आणि त्यामुळे मुलगी होईल या अंधश्रद्धेपोटी गर्भवतीच्या पतीने, सासूने आणि दोन नणंदांनी मिळून या गर्भवतीला प्रचंड मारहाण केली.
एका खाजगी कंपनीत मॅनेजर असलेल्या पतीने तर तिच्या पोटावरही लाथा मारल्या. अखेर गर्भवती महिलेच्या ओरडण्यामुळे घर मालकाच्या हे लक्षात आलं... आणि त्याने महिलेची सोडवणूक केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतोय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही याबाबत निषेध व्यक्त केलाय.
या प्रकरणी गर्भवती महिलेने वाकड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई होईलही, पण शिकलेले असूनही अंधश्रद्धेचा चष्मा घालून वावरणाऱ्या आणि प्रसंगी त्यासाठी हिंस्त्र पशूलाही लाजवेल असं कृत्य करायला लावणाऱ्या या मनोवृत्तीला काय करावं, असा प्रश्न आहे.