गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी :  परभणी जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून एका गर्भवती महिलेला थरमोकॉलच्या तराफ्यातून घेऊन जातांनाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथील गरोदर महिला शिवकन्या लिंबोरे यांना प्रसूती कळा येत होत्या. पण सलग तीन दिवस पुर परिस्थिती असल्याने शहराच्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे गावकरी आणि कुटुंबीयांनी ना इलाजास्तव सदर गर्भवती महिलेला थर्माकोलपासून बनवण्यात आलेल्या तराफ्यावर झोपवून नदी पार केली. या महिलेसोबत इतर ही काही महिलांनी जीव मुठीत धरून प्रवास केल्याचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जिल्ह्यात आणि परजिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोटे नदी नाल्याना पुर आल्याने रस्ते बंद होते. 



मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. गर्भवती महिलेला वेदना अधिक होत असल्याने कुटुंबियांना थर्मोकोलचा तराफा अधिक सुरक्षित वाटला आणि पुराच्या पाण्यातून सदर महिलेला थर्मोकोलच्या तराफ्यात झोपवून नदी पार करीत रुग्णालयात नेण्यात आले. महिला वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती झाली आहे. 


तिने मानवत येथील एका रुग्णालयांमध्ये गोंडस मुलाला जन्म दिलाय. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं सिजर करावे लागले आहे. या घटनेवरून परभणी जिल्ह्यातील दळणवळणाची अवस्था किती वाईट आहे हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होते.