जेलमध्ये आता हॉटेलचा फील, कैद्यांना मिळणार चिकण, मटण
तुरुंगात आता कैद्यांच्या आवडीप्रमाणे सर्व अन्नपदार्थ मिळणार आहेत. अगदी मांसाहारापासून ते मिठाईपर्यंत सर्वकाही
अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : जेल म्हंटलं की डोळ्यांसमोर येते एक अंधारी कोठडी आणि भूतकाळातल्या चुकांमुळे अंधकारमय वर्तमानात जगणारे कैदी. त्यामुळे जेलमध्ये रहावं असं कुणालाच वाटत नाही. पण आता राज्यातील जेल लवकरच कात टाकणार आहेत. कैद्यांना तिथं चिकण, मटण असं चमचमीत जेवण मिळू शकणार आहे. इतकंच नाही तर कैद्यांना ब्रँडेड वस्तूंची खरेदीही करता येईल. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी ही घोषणा केलीये.
तुरुंगात कैद्यांना हे पदार्थ मिळणार?
हा निर्णय अमंलात आला तर जेलमधल्या कैद्यांना चिकन, मटण, अंडी, मच्छी, दूध, दही, पनीर, पुरण पोळी, तूप, श्रीखंड, पेढे, बर्फी असे पदार्थ जेलमध्येच मिळू शकतील. इतकच नाही तर बॉर्नव्हीटा, ओट्स, भजी, वडापाव, कचोरी, च्यवनप्राश, ज्यूस, शिरा, लाडू , करंजी, शंकरपाळी अशा पदार्थांवरही त्यांना ताव मारत येईल. याशिवाय कैद्यांना ब्रँडेड वस्तू विकत घेण्याची मुभाही देण्यात येणार आहे.
मात्र, या पदार्थांसाठी कैद्यांना पैसे मोजावे लागणार आहे. नातलगांकडून मिळालेले पैसे किंवा जेलमधील मोबदल्यातून महिना साडेचार हजार खर्च करता येणार आहेत. तुरुंगात कैद्यांना शिक्षा भोगताना वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. याबदल्यात या कैद्यांना वेतन किंवा परतावा म्हणून ठराविक रक्कम दिली जाते.
मुंबईमध्ये बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्ताव असल्याचंही सुनील रामानंद यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्यातील येरवडा, नाशिक, नागपूर, ठाणे या करागृहांचा विस्तार करण्याचा प्रस्तावही आपण पाठ्वल्याच रामानंद यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जेलला हॉटेलचा फील आला तर आश्चर्य वाटायला नको.