लठ्ठपणामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
लठ्ठपणामुळे मानसिक त्रास सुरु असतानाच माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता
कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी चिंचवड : केवळ दिसायला लठ्ठ आहे म्हणून पती आणि सासरकडच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केलीय. पिंपरी चिंचवडच्या भोसरी भागात ही घटना घडल्याचं समोर आलंय. प्रियांका पेटकर असं आत्महत्या करणाऱ्या पीडित महिलेचं नाव आहे.
प्रियांकाचं केदार पेटकर याच्याशी २०१४ मध्ये लग्न झाले होते. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच पती केदार याने प्रियंकाला लठ्ठपणामुळे टोमणे मारायला सुरुवात केली. एव्हढच नाही तर तिची उपासमार करत अनेक दिवस तिला जेवणही दिलं जातं नव्हतं, अशी तक्रार प्रियांकाच्या नातेवाईकांनी केलीय.
पतीसोबतच सासरे श्रीकांत पेटकर आणि सासू सुरेखा पेटकर यांच्याकडूनही प्रियांकाचा छळ सुरूच होता. लठ्ठपणामुळे मानसिक त्रास सुरु असतानाच माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता. हा त्रास असह्य झाल्यामुळे माहेरी आलेल्या प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज प्रभुणे याने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.
प्रियांकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटकही होईल... पण सुंदरतेच्या भ्रामक कल्पना बाळगून पत्नीला अमानुष त्रास देणाऱ्या नराधमांची वृत्ती कशी बदलणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.