Pro dahi handi in maharashtra : दहीहंडीसंदर्भात महत्त्वाची बातमी बातमी आहे. यंदाच्या वर्षीपासून महाराष्ट्रात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती. आता या स्पर्धेची तारीख जाहीर झाली आहे. 31 ऑगस्टला मुंबईत  प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 11 लाखांचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहीहंडीला साहसी खेळाचा, तर गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याशिवाय प्रो दहीहंडी स्पर्धेची नियमावली ठरवण्यासाठी विधानभवनात बैठक झाली होती. त्यावेळी प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू करण्याचं ठरले.


उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रो दहीहंडी स्पर्धेची तारीख जाहीर केली आहे. मुंबईतील वरळी येथे 31 ऑगस्टरोजी प्रो गोविंदा अर्थात प्रो दहीहंडी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे पाहिले बक्षीस 11 लाख रुपये, दुसरे बक्षिस 7 लाख आणि तिसरे बक्षिस 3 लाख रुपये इतके ठेवण्यात आले आहे. 


वरळीत का आयोजीत केली स्पर्धा?


वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदार संघ आहे. भाजपचा या मतदार संघावर डोळा आहे. यामुळे भाजप सातत्याने वरळी विभागात विविधी कार्यक्रम आयोजीत करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यामुळेच प्रो दहीहंडी स्पर्धा वरळीतच का आयोजीत केली अस प्रश्न उदय सामंत यांना विचारण्यात आला.  वरळी निवडण्यामागे दुसरा कुठला हेतू नाही. राजकीय विषय नाही. वरळी डोम मध्ये कार्यक्रम होणार आहे.  वरळी येथे डोम थिएटर मध्ये या स्पर्धेत चे आयोजन करण्यात येणार आहे. या डोमची उंची 40 फूट आहे. त्यामुळे ही जागा निवडण्यात आली असल्याचे उदय सामंत म्हणाले. 


50,000 गोविंदांचा विमा


50,000 गोविंदांचा विमा उतरवला जाणार आहे. याकरिता 37 लाख 50 हजारांची तरतूद करण्यात आलेय. मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास गोविंदांना मदत मिळणार आहे. 2014 पासून प्रो लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती ती आता पूर्ण होत आहे. 31 ऑगस्ट रोजी प्रो लिग स्पर्धेचे आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे या समितीस शासनाने मान्यता दिली आहे.


8 आणि 9 थरांच्या गोविंदा पथकाला आर्थिक सहाय्य 


ठाणे, मुंबई येथील औद्योगिक विकास महामंडळ द्वारा आठ  आणि नऊ थराच्या गोविंदा पथकाला आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्यासाठी 1 कोटी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दहीहंडी हा आपला मराठी पारंपारिक उत्सव असून आज या उत्सवाचे स्वरूप हे साहसी खेळ म्हणून व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे. प्रो गोविंदाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू तयार होतील. या माध्यमातून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नाव लौकिक करतील अशी आशा आहे.