संगमनेर : संगमनेर तालुक्यातील तरूण शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत दुष्काळी परिस्थितीतही रिजवान जातीची काकडी लावत लाखो रूपयांचे उत्पादन मिळवले आहे. या तरूणाची कहाणी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. अरूण कुरकुटे असे या तरुणाचे नाव असून तो संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथे राहतो. अरुणची वडीलोपार्जीत 35 एकर शेती आहे. मात्र पाण्याचं दुर्भीक्ष असल्याने आता करायचं काय ? हा प्रश्न अरूणलाही भेडसावत होता. त्यातूनच पॉलीहाऊसमधील रीजवान जातीची म्हणजे चायना काकडीची लागवड करण्याचा निर्णय त्याने घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या वीस गुंठे क्षेत्रावर सरकारच्या अनदानातून पाँली हाऊस उभारले आणी रीजवान जातीची काकडी झिकझॅक पद्धतीने लावली.. साधारण चार हजार काकडीचे झाड वीस गुंठे क्षेत्रात लावले आहेत. एका झाडाच्या बियाणासाठी अकरा रूपये खर्च केला.. मल्चिंग पेपर,  ठिबक सिंचन, शेणखत यासह तापमान मर्यादीत ठेवण्यासाठी वॉटर फॉगचीही पॉलीहाऊसमध्ये व्यवस्था करण्यात आली..याला एकूण एक लाख रुपये खर्च झाला.


रीजवान जातीची ही काकडी लावल्यानंतर अवघ्या 35 व्या दिवशी काकडी काढण्याला सुरूवात झाली..जवळपास दहा फुटांपर्यंत वाढणाऱ्या या काकडीच्या वेलीला खालपासुन वर पर्यंत काकडी लागलेल्या असतात.. साधारण सत्तर दिवसाचा या पिकाचा हंगाम आहे. दिवसाआड काकडीची तोडणी केली असता वीस गुंठ्यात हजार अकराशे किलो काकडी मिळते.. पारंपारिक काकडीपेक्षा या काकडीला परदेशात जास्त मागणी असल्याने भावही जास्त मिळतो..



अरूणकडे असलेल्या 35 एकर शेतीतून जेवढे उत्पन्न मिळत नाही तेवढे वीस गुंठे काकडीतून मिळाले आहे.. आत्तापर्यंत जवळपास 27 टन काकडी 18 ते वीस रूपयांनी विकली गेलीय. ज्यातून खर्च वजा केला असता पाच लाखांचा नफा शिल्लक राहीला आणी अजूनही दीड लाख रूपये मिळण्याची अरूणला अपेक्षा आहे. पारंपारिक शेतीपेक्षा या शेतीतून नफाही जास्त आणि खर्चही कमी आहे.. इतर शेतकऱ्यांनी देखील हे तंत्रज्ञान स्वीकारायला हवे..पाँलीहाऊसचे तंत्रज्ञान उत्तम आहे मात्र सरकारने जास्त क्षेत्रासाठी अनुदान द्यायला हवे अशी अपेक्षा अरूणने व्यक्त केली आहे.