हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : बुलढाण्यात (Buldhana) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बसला (Bus Accident) लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून (Nagpur) पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाच्या इथे हा अपघात झाला. दुसरीकडे या अपघातात अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहे. नागपूरवरुन घरी परतत असताना पुण्याच्या एका कुटुंबाचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
 
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावाच्या एकाच कुटूंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्राध्यापक कैलास गंगावणे, पत्नी कांचन गंगावणे व मुलगी डॉक्टर सई गंगावणे या तिघांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तिघांच्याही मृत्यूमुळे आंबेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.


इच्छा नसतानाही नागपूरला गेली होती सई


"घडलेली घटना फारच दुर्दैवी आहे. कैलास गंगावणे, कांचन आणि सई गंगावणे हे आमच्या शेजारी राहत होते. आमच्या घरच्यांपैकीच ते एक होते. त्यांची मुलगी पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी होती. तिला जायचं नव्हतं तरी सुद्धा ती भावाची अॅडमिशनसाठी वडिलांसोबत नागपुरला गेली होती. घरी येत असतानाच हा भीषण अपघात घडला," अशी प्रतिक्रिया गंगावणे कुटुंबियांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.


कसा घडला अपघात?


विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. 30 जूनला नागपूरहून संध्याकाळी 5 वाजता ही बस पुण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. 1 जुलैच्या रात्री 1.22 मिनिटांनी पिंपळखुटा गावाजवळ धावत्या बसचे समोरील टायर अचानक फुटल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली. त्यानंतर ट्रॅव्हल्समधल्या डिझेट टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. काही कळायच्या आता बस पेटल्याने अनेकांना त्यातून बाहेर पडता आले नाही. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून कोळसा झाला आहे.