लातूर : औसा तालुक्यातील भादा गावातील नामदेव नागोराव बनसोडे या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील उसाची चक्क जंगी मिरवणूक काढलीय. बनसोडे या शेतकऱ्याचा जवळपास दोन एकर ऊस. चार कारखान्याचे ते सभासद आहेत. शेतात पिकलेला ऊस वेळेत जावा यासाठी ते गेल्या कांही दिवसांपासून प्रयत्न करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनसोडे यांच्या नावाने ज्या कारखान्यांचे शेअर्स आहे, त्या कारखान्यांकडून प्रयत्न करूनही वेळेत ऊस नेला जात नव्हता. बनसोडे हताश झाले पण त्यांनी जिद्द कायम ठेवली होती. मनात खंत ठेवूनच ते शेतातील आपला ऊस घालविण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत होते. अशातच औसा तालुक्यातील गोंद्री येथील साई शुगर कारखान्याचा पर्याय त्यांना उपलब्ध झाला.


साई शुगर कारखान्याकडून तोडणी सुरू झाली. इतके महिने प्रतीक्षा केली. पण, त्या कारखान्याने अवघ्या दोन दिवसात डोकेदुखी झालेल्या उसाचा प्रश्न मार्गी लागला. शेतातला ऊस अखेर साखर कारखान्यता गेल्यामुळे शेतकऱ्याला आनंद झाला.


आपल्या ऊसाची खेप जाणार असल्यामुळे या शेतकऱ्याने एक उत्सवच साजरा करण्याचे ठरवलं. शेअर्स असलेल्या हक्काच्या कारखान्याने वेळेत ऊस नेला नाही. पण, सभासद नसलेल्या दुसऱ्या एका कारखान्याने तो ऊस नेला.



हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्या शेतकरी पठ्ठयाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची गावातून आतिषबाजी करत बॅण्डबाजा लावून चक्क जंगी मिरवणूक काढली. कारखान्याचे व फडावर काम करणाऱ्या कामगारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्याने वाघ्या मुरळी, गोंधळी या पारंपरिक कलावंताच्या नृत्यासह वाजत-गाजत, फटाक्यांची आतिषबाजी केली. 


ग्रामदैवतांना श्रीफळ अर्पण करून सभासद असलेल्या कारखान्याच्या डोळ्यात त्याने झणझणीत अंजन घातलं. तब्बल चार तासाहून अधिक वेळ ही ऐतिहासिक मिरवणूक आणि जल्लोष सुरु होता.