सोमवारी पुण्यातून बेपत्ता, गुरुवारी सापडली बॅग अन् शनिवारी दरीत मृतदेह... 19 वर्षीय विराजच्या मृत्यूचं गूढ कायम
Pune 19 Year Old Man Death Mystery: सोमवारी हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पुणे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. मात्र या शोधाचा अनपेक्षित अंत झाला.
Pune 19 Year Old Man Death Mystery: पुण्यातील कोथरूड भागातून हरवलेल्या विराज फड या 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह देवकुंड व्हयू पॉइंट दरीत आढळून आला आहे. ताम्हिणी घाटातील व्ह्यू पॉइंट परीसरात काही पर्यटक आले असता त्यांना एक बॅग आढळली. पोलिसांच्या मदतीने या पर्यटकांनी बॅगमधील मोबाईल सुरू केला असता तो विराज फड याचा असल्याचे समजले. त्यानंतर या भागातील दरीमध्ये विराजचा शोध सुरू झाला. शनिवारी सायंकाळी वेगवेगळी बचाव पथके, अॅडव्हेंचर टीम, वनविभाग, पोलीस यंत्रणा यासाठी कामाला लागल्या. रात्री आठच्या सुमारास खोल दरीत बचाव पथकाला विराजचा मृतदेह आढळून आला. रेस्क्यू टीमबरोबर खोपोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये मृतदेह सापडल्यानंतर स्ट्रेचर आणि दोराच्या सहाय्याने विराजचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
पर्यटकांना मोबाईल सापडला, त्या अधिकाऱ्याने तो सुरु केला
विराज बेपत्ता असल्याची तक्रार सोमवारीच पुणे पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. 28 तारखेला ताम्हिणी घाटात देवकुंड व्ह्यू पॉइंट येथे काही पर्यटक भटकंतीसाठी आले होते. त्यावेळेस त्यांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग दिसली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल आणि कपडे होते. यासंदर्भातील माहिती प्लस व्हॅली हॉटेलमध्ये देऊन पर्यटक निघून गेले. मुळशी पोलीस ठाण्यातील अधिकारी महेश पवार यांनी बंद मोबाईल सुरु करुन घेतला. तेव्हा हा मोबाईल विराजचा असल्याचं स्पष्ट झालं. या बॅगवरुन विराजबरोबर याच परिसरात काहीतरी घडल्याचा अंदाज बांधून त्याचा शोध सुरु करण्यात आला.
मोबाईल सापडल्यानंतर शोध सुरु करण्यात आला
देवकुंड परिसरामध्ये हरवलेल्या विराजसाठी शोध सुरु केला. बऱ्याच तासांनंतर विराजचा मृतदेह रेस्क्यू टीमला सापडला. दरीमध्ये एका झाडाखील विराजचा मृतदेह आढळून आला. या शोध मोहिमेमध्ये शेलार मामा रेस्क्यू टीमनेही पोलिसांना मदत केली. विराजचा शोध घेण्यासाठी ड्रोनबरोबरच आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. दरीत उतरुन मृतदेहाचा शोध घेणाऱ्या रेस्क्यू टीममधील सदस्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.
अनेक प्रश्न अनुत्तरित
या प्रकरणामधील पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत. विराजबरोबर नेमकं काय घडलं? तो दरीत कसा पडला? हे सर्व घडलं तेव्हा त्याच्याबरोबर कोणी होतं का? आठवडाभर या ठिकाणी असलेली ही बॅग कोणालाही कशीच दिसली नाही? यासंदर्भातील गूढ कायम आहे. पोलीस या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत.