नसते धाडस करु नका! इंजिनियअर तरुणाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू
Pune Accident : मध्य प्रदेशातून मिटींगसाठी आलेल्या तरुणाने एका चुकीमुळे प्राण गमावले आहेत. मित्रांनी त्याला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. 14 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे
निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा पानशेत धरणात (Panshet dam) बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. वेल्हा तालुक्यातील (Velha taluka) धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात बुडून या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पाय घसरून पडल्यानं या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 14 तासांच्या शोध मोहिमेनंतर तरुणाचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. मोहित हेमंत सराफ असे मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.
वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळच्या धिंडली येथील एका रिसॉर्टच्या परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात मित्रांसोबत फिरायाला आलेल्या मोहित हेमंत सराफ या संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे. मोहित हा मध्य प्रदेशचा राहणारा होता. तो बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी पुण्यात आला होता. 7 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली यांचा ग्रुप पानशेत धरणाजवळील धिंडली येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता.
दरम्यान संध्याकाळी 5.30 वाजता सर्व जण रिसॉर्टवर पोहचले होते. रिसॉर्ट फिरल्यानंतर मित्रांसह सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅकवॅाटरच्या गुडघाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ हा पाय घसरुन खोल पाण्यात पडला. त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील पाण्यात पडला. पण जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. नंतर मोहितला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहितला पाण्यातून वर काढण्याचा खूप प्रयत्न करत केला. या प्रयत्नात अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता आणि त्याचा देखील पाय घसरु लागल्याने सर्वजण घाबरुन पाण्याच्या बाहेर आले. तितक्यात मोहित सराफ हा खोल पाण्यात बुडाला. कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत.
पाण्यात पडलेल्या मोहितचा 14 तासाच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान मृतदेह मिळून आल्याची असल्याची माहिती पानशेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यानी दिली. यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मदतकार्य केले. वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.