बाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणतात, `जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार?`
Baba Aadhav: उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले आहे.
Baba Aadhav: ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत बाबा आढावांनी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ईव्हीएमविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू होतं.उद्धव ठाकरेंच्या हातून पाणी घेऊन बाबा आढाव यांनी आपलं उपोषण सोडलंय. त्यांच्या आंदोलनाला आज शरद पवारांसह अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी भेट दिलीये. शरद पवार यांनीदेखील आंदोलनस्थळी भेट दिली होती. बाबा आढावांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आजचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला भेटी दिल्यात. त्यांच्या आंदोलनाला अजित पवार यांनीदेखील भेट दिली होती. यावेळी अजित पवारांनी विरोधकांनी चॅलेंज दिलंय. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप केलाय. EVM घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना केलंय..
काय म्हणाले अजित पवार?
आपलं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आंदोलन करत आहेत.बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी निवडणूक आयोग, कोर्ट यांच्याशी संबंधित आहेत.लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मावीआच्या 31 जागा आल्या. आमच्या 17 जागा आल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझ्या उमेदवार पराभूत झाल्या. जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे.तुम्ही आदरणीय आहात.साडेपाच नंतर 15 टक्के मतदान वाढलं नाना पटोले म्हणतात. पण लोकांनी केव्हा मतदानासाठी यायचं आणि रांगेत उभ राहायचं तो त्यांचा अधिकार, असल्याचे अजित पवार म्हणाले.
आम्ही गरजुंसाठी योजना राबवल्या. अंतुलेनी संजय गांधी निराधार योजना राबवली. कर्नाटकात योजना आहेत. आप चे सरकार असलेल्या पंजाबमध्ये योजना आहेत. निवडणुकीत काँग्रेसने देखील आश्वासने दिली होती. त्यांना प्रलोभने म्हणायचं का? असा प्रश्न त्यांनी विचारला. ईव्हीएमबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. लोकसभेला तुमच्या जागा आल्या तेव्हा ईव्हीएम चांगले. पण पराभव झाला की वाईट. आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले. मी याविषयावर चर्चा व्हायला पाहिजे याविषयी मी दिल्लीत गेल्यावर नक्की सुचवेन. अजूनपर्यंत ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचं कोणी सिद्ध करून दाखवू शकलं नाही.222 जागा यशवंतराव चव्हाण असताना आल्या होत्या. त्यांनतर आताच पहिल्यांदा 232 जागा आल्या आहे.आमचे दिलीप वळसे पाटील 1500 मतांनी आले. मग मशीन मॅनेज झाले नाही म्हणून इतक्या कमी मताने आले असं आम्ही म्हणायचे का? आमची विनंती आहे की तुम्ही हे आंदोलन थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले. मी काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी, एक नागरिक म्हणून तुमच्या मुलासारखा म्हणून तुमच्याकडे आलो.सरकार स्थापन झाल्यानंतर कदाचित पुन्हा येईल.आम्ही निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली हे आम्ही नाकारत नाही. आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवत नसल्याचेही ते पुढे म्हणाले.
काय म्हणाले बाबा आढाव?
सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीxपेक्षा जनतेची नाय्यबुद्धी महत्वाची आहे. दडपशाही सुरू आहे. हा प्रश्न जनतेसमोर आणणे आमचे काम आहे. हे आंदोलन चिरडून चालणार नाही.आम्ही गांधीजींच्या मार्गाने हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे बाबा आढाव यावेळी म्हणाले. यावेळी हे आंदोलन चिरडले जाणार नाही, असे अजित पवार त्यांना म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर सोडले उपोषण
बाबा तुम्ही म्हातारपण स्वीकारायला तयार नाहीत. तुम्ही आम्हाला प्रेरणा देतहात. प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाहीत.जिंकलेले आणि हरलेले दोन्ही इथे येत आहेत. दोघांचाही निकालावर विश्वास नाही. तुम्ही सत्यमेव जयते म्हणता. आता फक्त सत्तामेव जयते सुरू असल्याचा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. लोकशाहीत माझे मत कुठे जातंय हे कळण्याचा अधिकार तुम्ही काढून घेतला.राक्षसी बहुमत मिळूनही सगळ्यांचे चेहरे पडलेले का आहेत. राजभवनावर जाण्याऐवजी शेतात का जातात. आमवस्येचा मुहूर्त का बघतात?आपण सत्तेत येवू असं त्यांनाही कधी वाटलं नव्हतं.हम सब एक है म्हणत असताना ते संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. हे आंदोलन आपण महाविकास आघडीने पूर्ण राज्यभर न्यायला पाहिजे.लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, असे आवाहन ठाकरेंनी यावेळी केले. बाबांनी अधिक आत्मक्लेश करून घेऊ नये. आम्ही हे आंदोलन पुढे नेऊ. तुम्ही हे उपोषण सोडावे हा माझा हट्ट समजा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.