Pune Bhatghar Dam Kambreshwar Temple : पुण्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटल्याने पाण्याखाली असलेले पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आलं आहे. त्यामुळे धरणातील पाणलोट क्षेत्रातील नदी पात्रात असणाऱ्या काबंरे गावातील पांडवकालीन कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आलं आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहेत. सध्या पाण्याखाली गेलेले हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिकांसह इतिहास संशोधकांनी गर्दी केली आहे. 


फक्त मे आणि जून महिन्यातंच दिसतं पुण्यातील 'हे' मंदिर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोर तालुक्यापासून 35 किमी अंतरावर वेळवंडी नदीच्या किनाऱ्यावर कांबरे हे गाव वसलेले आहे. या गावातील धरणाच्या पात्रात प्राचीन कांबरेश्वराचे मंदिर आहे. सध्या भाटघर धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने हे मंदिर दिसू लागले आहे. या मंदिराचे नाव कर्मगरेश्वर असे आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहेत. हे मंदिर मे आणि जून महिन्यात पाण्याबाहेर असते. तर इतर दहा महिने पाण्यात असते. 


कळसाचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि भाजलेल्या विटांचे


या मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे आणि त्याच्यावरील बाजूचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि भाजलेल्या विटांचे आहे. तर मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. हे दगड साधेसुधे नसून 20 मजुरांना देखील एकत्र येऊन उचलता येणार नाहीत इतके ते मोठे आहेत. 



मंदिराचा पाया आणि बांधकाम आजही मजबूत


पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करुन आयातकृती दगड एकावर एक बसवून मंदिराची रचना केली आहे. हे मंदिर पाण्यातून पूर्ण बाहेर आल्याने भुतोंडे, वेळवंड भागासह इतर ठिकाणाहून नागरिक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. यापूर्वी मंदिरात जाताना वर चढून जावं लागत असे. पण आता गाळामुळे मंदिराच्या पायऱ्या गाडल्या गेल्या आहेत. या मंदिरासमोर नदी असलेला चौथरा आहे. या मंदिराचा पाया आणि बांधकाम आजही मजबूत आहे. पण धरणांच्या लाटांचा थोडाफार फटका बसला आहे. मात्र सध्या पाण्याखाली गेलेलं हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिक आणि इतिहास संशोधक याठिकाणी भेट देताना दिसत आहेत.