अरूण मेहेत्रे झी मीडीया, पुणे : गेल्या 9 दिवसांपासून सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा पुण्यातून (Pune) अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्वर्णव या चार वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वर्णवच्या वडिलांनी सोशल मीडियावर 'मागाल ते देतो, माझ्या काळजाच्या तुकड्याला सोडा' असं आवाहन अपहरणकर्त्यांना केलं होतं. अखेर नऊ दिवसांनंतर स्वर्णव चव्हाण  (Swarnav satish chavhan) हा चिमुरडा आपल्या आईच्या खुशीत सामावला.


सीसीटीव्हीमध्ये अपहरणाची दृष्य कैद
11 जानेवारी रोजी  पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून चार वर्षीय स्वर्णव सतीश चव्हाण उर्फ डुग्गूचं अज्ञातानं अपहरण केलं होतं. स्कुटरवरुन स्वर्णवला नेताची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली होती. 


9 दिवसानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात स्वर्णव सापडला. 10 मिनिटांत परत येतो असं सांगून अपहरणकर्त्यानं सोसायटीच्या वॉचमन दादाराव जाधव यांच्याकडे स्वर्णवला सोपवलं. त्यानंतर तो परतलाच नाही. 


अखेर स्वर्णव रडायला लागला तेव्हा तिथं आलेल्या लिफ्टमन तानाजी गिरमकर यांनी त्याच्या बॅगेतल्या पुस्तकावरील नंबरवर संपर्क केला. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आणि तब्बल 9 दिवसानंतर स्वर्णव अर्थात सर्वांचा लाडका डुग्गू आई-बाबांच्या कवेत विसावला. 


स्वर्णव परतल्याचा आनंद
स्वर्णव परतल्यानं चव्हाण कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. केवळ चव्हाण कुटुंबीयच नव्हे तर तो राहत असलेल्या परिसरात उत्साहाचं वातावरण आहे. एकमेकांना पेढे भरवत सर्वांनी जल्लोषही केला. डुग्गू सुखरूप सापडल्यानं पोलिसांही सुटकेचा निश्वास सोडलाय. 


सोशल मीडियावर आर्त साद
अवघ्या 4 वर्षांच्या स्वर्णवचं भर दिवसा, भर रस्त्यातून अपहरण करण्यात आलं होतं.जे मागाल ते देतो पण लेकाला सोडून द्या अशी आर्त साद त्याच्या वडिलांनी सोशल मीडियातून घातली होती. इतकच नाही तर त्याला ताप आला तर कोणती औषधं द्याल, हेही सांगितलं होतं. सोशल मीडियातली त्यांची पोस्ट पाहून अनेकजण हळहळले.


अपहरणाचं गुढ कायम
पुणे पोलीस दलातील 300 कर्मचारी गेले सात दिवस स्वर्णवचा शोध घेत होते. स्वर्णवच्या सुटकेनं सगळ्यांचाच जीव भांड्यात पडलाय. आता त्याचं अपहरण नेमकं कोणी केलं? त्यामागचं कारण काय होतं?  याचा उलगडा होणं गरजेचं आहे.