पुणे : Coronavijrus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असला तरीही प्रशासनाने या विषाणूशी लढा देत असताना जिद्द काही सोडलेली नाही. यामध्ये प्रशासनाला साथ मिळत आहे ती म्हणजे काही खऱ्याखुऱ्या लढवैय्यांची. हे लढवैय्ये काही वर्दीतले आहेत कर काही जनसेवा करणारे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व मार्गांनी नागरिकांना कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचा सल्ला पावलोपावली देण्यात येत आहे. यामध्येच आता पुणे पोलिसांनीही कंबर कसली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना एका व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक आवाहन करत, थेट देवाला आणि जनतेला सहकार्यासाठी आर्त हाक मारली आहे. 


'वाट दिसू दे गा देवा' या चित्रपट गीताचा आधार घेत त्यावर या मंडळींनी पाटीवर लिहिलेले संदेश सर्वांपर्यंत पोहोचवले आहेत. 'हात धुवा पुन्हा पुन्हा, घरात आहे बाळ तान्हा';  'तुम्ही सुरक्षित तर, कुटुंब सुरक्षित'; 'कृपया नियम पाळा! माझ्यासाठी, आपल्या देशासाठी!' आणि 'आम्हा ना मिळे वर्क फ्रॉम होम, रक्षितो तुमचे होम स्वीट होम' असे संदेश या रक्षणकर्त्यांनी दिले आहेत. 


सुरक्षेचा वसा घेतलेल्या या मंडळींनी त्यांच्या कुटुंबांना दूर सारत जनतेचं हित आपलंसं केलं आहे, त्यामुळे त्यांना सहकार्य करणं हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्यच नव्हे तर आपली जबाबदारी आहे जी पार पाडलीच गेली पाहिजे. 



अतिशय प्रभावी अशा या व्हिडिओमध्ये पुण्याची काही प्रसिद्ध ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पण, त्याहूनही गाण्याच्या ओळी आणि संदेश देणारी ही मंडळीच खऱ्या अर्थाने आदर मिळवत आहेत. फक्त पुणेच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात सध्याच्या घडीला अत्यावश्ययक सेवांमध्ये येणारी प्रत्येक यंत्रणा दिवसरात्र एक करुन कोरोनाशी झुंज देत आहेत. त्यामुळे त्यांची ही झुंज यशस्वी करण्यात आपणही हातभार लावूया. 
#घरीराहूया_सुरक्षितराहूया