COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : पुणे महापालिकेच्या सभागृहात एखाद्या विषयावर राडा होणं ही गोष्ट नवीन नाही. मात्र, आता सभागृहतल्या दोन नेत्यांमधला वाद चक्क पोलिसांपर्यंत पोहचलाय. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि  भाजपचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी एकमेकांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. पाहूया काय आहे प्रकरण...


महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानं सर्वसाधारण सभेत हे असं असाधारण वळण घेतलं. 


या संदर्भांत प्रशासनाकडून खुलासा मागणाऱ्या अरविंद शिंदेंना सभागृह नेते भिमालेंच्या संतापाला सामोरं जावं लागलं. दोघांमधला वाद अगदी वैयक्तिक पातळीवर गेला. आपण महापालिकेच्या सभागृहात आहोत की आणखी कुठे, याचा विसर या माननीयांना पडला, असंच म्हणता येईल. 


काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे हे फ्रॉड आहेत, ते पैसे खातात अशा स्वरूपाचे आरोप भिमाले यांनी भर सभेत केले. त्यावर संतापलेल्या शिंदे यांनी आता भिमाले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दिलीय. भिमाले यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


सभागृहातल्य़ा इतर सभासदांनी मध्यस्थी केल्यानंतर भिमाले शांत झाले. अरविंद शिंदे यांनी केलेली तक्रार म्हणजे स्टंटबाजी असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय. सभागृहातला विषय बाहेर आणून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.


श्रीनाथ भिमालेंच्या सभागृहातल्या वर्तनाचा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे सह इतर अनेक संघटनांनी निषेध केलाय. सभासदांच्या मागणीनुसार दोन्ही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं सभेच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. असं असलं तरी सभागृहाच्या प्रतिमेला गेलेले तडे त्यातून भरून निघणं अशक्य आहे.