पुणे: डॉक्टर डेच्या दिवशीच पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील वानवडी परिसरात राहणा-या निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं या डॉक्टर दाम्पत्याची नावं आहेत. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वाद सुरू होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका छोट्याशा वादातून डॉक्टर दाम्पत्याने स्वत: आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी बाहेर गेलेल्या निखिल बरोबर अंकिताचे फोनवर बोलणं सुरू असतांनाच वाद झाला आणि जीवाचे बरं वाईट करून घेईल अशी धमकी अंकिताने देत फोन कट केला. 


रागाच्या भरात अंकिताने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. निखिल घरी आल्यानंतर हे सगळं पाहताच त्याला मोठा धक्का बसला. पत्नी जाण्याचा धक्का सहन न झाल्याने त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मात्र कोणत्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. 


आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला? ते फोनवरुन नक्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असून वाद नक्की कशामुळे झाला याचा तपास वानवडी पोलिस घेत आहेत.


पुणे शहरात डॉक्टर्स डे च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. आज देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा होत असताना पुण्यातील वानवडी परिसरात आझाद नगरमधील ही घटना घडल्यानं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या हा पर्याय नाही. त्यांनी एवढ्या टोकाचं पाऊल उचलायला नको होतं असंही कुटुंबीय आणि सर्व मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत आहे.