पुणे : पुण्यातील एका वृद्ध दाम्पत्यानं सियाचीनच्या सिमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी आपले दागिनेही विकलेत. सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लान्ट बनवण्याचा आपला उद्देश असल्याचं या दाम्पत्याचं म्हणणं आहे. या ऑक्सिजन प्लान्टचा वापर भारतीय सीमेवर आपल्या प्राणांची पर्वा न करता तैनात असणाऱ्या जवानांसाठी केला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. सियाचीनमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते यासाठी देशसेवेसाठी आपले प्राण संकटात टाकणाऱ्या जवानांसाठी त्यांना ऑक्सिजन प्लान्ट उभारायचा आहे. 


एकच लक्ष्य... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या रहिवासी असलेल्या 56 वर्षीय सुमेधा या एका शाळेत भूगोल विषय शिकवतात. त्यांचे पती योगेश चिताडे अगोदर भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत होते. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ मैसूरमध्ये काम केलं. चिताडे दाम्पत्याचं एकच लक्ष्य आहे... आणि ते म्हणजे सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारणं... यासाठी या दाम्पत्यानं आपले पारंपरिक दागिनेही विकलेत. विकलेल्या दागिन्यांतून जे सव्वा लाख रुपये मिळाले ते पैसे त्यांनी आपल्या मिशनसाठी ट्रस्टमध्ये जमा केलेत. 


जवानांच्या कल्याणासाठी काम


चिताडे दाम्पत्य 1999 पासून भारतीय सेनेत जवानांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लान्ट बनवण्याच्या मिशनला सुरुवात त्यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. यासाठी त्यांनी सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन नावाचा ट्रस्ट उभारला. या ट्रस्टमध्ये जो पैसा जमा होणार आहे त्या पैशांतून ऑक्सिजन प्लान्ट बनवणं सुरु केलं जाईल. 


लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लान्ट तयार व्हावा यासाठी आणखी कुणाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा आपणच पैसे उभारणं त्यांनी योग्य समजलं. यासाठीच त्यांनी दागिने विकलेत. प्लान्टसाठी उभारण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये चिताडे दाम्पत्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणीदेखील मदतनिधी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्लान्टसाठी जवळपास सव्वा करोड रुपयांची आवश्यकता आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, सियाचीनमध्ये 30 ते उणे 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत गारठा असतो... हाडं गोठवणाऱ्या या थंडीत भारतीय जवान सीमा सुरक्षेसाठी कायम तैनात असतात.