Bomb Making Training Camp: आयसिस''च्या महाराष्ट्र गटाकडून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम सुरू होते. याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंढवा भागात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात हा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पुण्यात आणल्याचे तपासात ‌उघडकीस आले आहे. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साकी आणि खान यांचा शोध घेत असताना बडोदावाला याने त्यांना पुण्यात आणून त्यांच्या मार्फत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.


एनआयएने आयसिसच्या महाराष्ट्र गटाचा म्होरक्या डॉ. अदनान अली सरकार याला अटक केली होती. कोथरुड भागात दुचाकी चोरताना अटक केलेल्या दहशतवाद्यांशी डॉ. सरकारचे संबंध असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली होती. आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी  एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. 


दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यात हा गट सक्रिय होता. या गटाचे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएसने पुण्यातील दाखल गुन्ह्यात बडोदावाला याला नुकतेच मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले आहे. 


बडोदावाला याने साकी आणि खान यांना पुण्यात आणून त्यांच्यामार्फत काही तरुणांसाठी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. बडोदावाला याच्या सांगण्यावरून अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याने साकी आणि खान यांना कोंढव्यात राहण्यासाठी खोली मिळवून दिली होती. साकी आणि खान हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून, दीड वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास होते.


दहशतवाद्यांकडून मोटार, पिस्तूल, काडतूसे जप्त


एटीएसने शनिवारी रात्री कारवाई करुन दहशतवाद्यांची दुचाकी, मोटार जप्त केली, तसेच पिस्तूल आणि पाच काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांकडून रासायनिक पावडर, द्रव्ये, प्रयोगशाळेतील उपकरणे, पिपेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.