माझ्या मित्राला संपवून टाक! मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील खळबळजनक प्रकार
Pune Crime : पुण्यात एका खासगी सावकाराने मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सुसंस्कृत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) पुन्हा एकदा जादूटोण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखून 18 लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. मित्राच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीने स्मशानभूमीत जाऊन पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्याजवळ असलेल्या सुरतापवाडी गावातील स्मशानभूमीत या अघोरी पूजेने गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी पुण्यातील सोरतापवाडीजवळ स्मशानभूमीत गणेश तात्यासाहेब चौधरी याने अघोरी पूजा घातली आहे. गणेश चौधरी हा अवैध सावकार आहे. पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणाऱ्या त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने घातली स्मशानभूमीत अघोरी पूजा घातली होती. गावताल्या लोकांना हा सगळा प्रकार समजताच त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर गणेश चौधरी याच्या विरोधात पुण्यातील लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, चौधरी हा रात्री अपरात्री सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू बाबा 18 लाख घेऊन फरार
पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका भोंदूबाबाने युवकाचे 18 लाख रुपये घेऊन पळ काढला आहे. हडपसर परिसरातील ससाणे नगरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस याप्रकरणी भोंदूबाबासह चार जणांचा शोध घेत आहेत. पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत मांत्रिकाने तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्राने एका भोंदू बाबाशी ओळख करुन दिली होती. भोंदूबाबाने पैशाचा पाऊस पडतो सांगून परदेशी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरु असताना तिथे आलेल्या तोतया पोलिसांनी 18 लाखांची रक्कम ताब्यात घेतली आणि भोंदूबाबासह विनोद परदेशी यांना मारहाण केली. त्यानंतर तोतया पोलिसांनी 18 लाख रुपयांसह पळ काढला.