Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार...अघोरी पूजा, शारीरिक छळ अन्... 5 वर्षांनी तिनं फोडली वाचा
Crime News : गेल्या 5 वर्षांपासून सुरु असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना विविध कलमांखाली अटक करत गुन्ह्यांची नोंद केली आहे
Pune Crime: विद्येच्या माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune News) जादूटोणा (diablerie) करुन अघोरी पूजा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन तृतीयपंथीयांना अटक देखील करण्यात आली होती. सामाजिक संघटनांकडून सातत्याने याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरीही सर्रासपणे हे प्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत.
पतीच्या संगनमताने पत्नीचा अघोरी छळ
पुण्यात जादूटोणा (Black Magic) आणि अघोरी पूजा करुन एका महिलेचा छळ करण्यात आलाचा प्रकार समोर आला आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी, भरभराट व्हावी व मुल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यानी अघोरी पूजा केल्याचे महिलेने म्हटले आहे. पती तसेच घरातील इतर जणांनी संगनमत करुन शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार या महिलेने पोलिसांत दिली आहे. पुणे शहरातील धायरी भागात हा प्रकार 2019 पासून हा सर्व प्रकार सुरू होता. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अखेर तिने पोलिसांत धाव घेतली...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. सासरच्यांनी अनेक वेळा लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी माझ्याकडे मागणी केली आणि त्यासाठी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. घरात भरभराटी व्हावी तसेच मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून माझी अघोरी पूजा केली आणि जादूटोणा केला होता, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. सासरच्या जाचाला अखरे कंटाळून पोलिसांत धाव घेतल्याचे महिलेने म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडात्मक कलम 498(अ), 323, 504,506/2, 34सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 3 अंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.