पुण्यात मार्केट यार्डमध्ये `मुळशी पॅटर्न`लाही लाजलवेल असा थरार, सरपंचाला 10 कोटी व्हाईट करणं अंगलट
Pune Crime : पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाती आरोपींना ताब्यात घेतले आहे तर सरपंच अद्याप फरार आहे. पुण्यात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गुरुवारी दुपारी पुणे मार्केट यार्डमधून (Pune Market Yard) 50 लाखाच्या खंडणीसाठी (extortion) तिघांचे अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या अपहरण नाट्याला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावचा सरपंच असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संरपंच फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नेमकं प्रकरण काय?
आदेश नागवडे असे सरपंचाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच आदेश नागवडे याने त्याच्याकडे असलेले काळे पैसे पांढरे करण्यासाठी अपहरण केलेल्या व्यक्तींना दिले होते. यासाठी अपहरण झालेल्या व्यक्तींनी सरपंचाकडून प्रोसेसिंग फी आणि टोकन अमाउंट म्हणून 34 लाख रुपये घेतले होते. सरपंचाला 10 कोटी रुपये पांढरे करुन हवे होते. मात्र अपहरण झालेल्यांनी ठरल्याप्रमाणे काम केले नाही. त्यामुळे सरपंच व त्याच्या साथीदारांनी काळे पैसे पांढरे करण्यासाठी दिलेल्या तिघांचे अपहरण केले.
तिघांना घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी तांत्रिक विश्लेषण व अहमदनगर पोलिसांच्या मदतीने तिघांना काही तासात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका लॉजवरून ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने या तिघांना ताब्यात घेतले. तर इतर साथीदार फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. याप्रकरणी पोलिसांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात ताब्यात घेतलेले तिघे संशयित आरोपी आणि त्यांच्या सहा ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा अपहरण
अपहरण झालेल्या एका व्यक्तीच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली होती. अपहरण झालेली व्यक्ती मुंबईतील साकीनाका परिसरात राहते. मुंबईतच एका कंपनीत तो प्रतिनिधी म्हणून काम करत होता. तर अपहरण झालेल्या इतर दोघांमध्ये एक नातेवाईक तर दुसरा त्याचा मित्र होता. कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्यात आले होते. गुरुवारी दुपारी मार्केट यार्ड परिसरात आले असताना, बारा वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी गाडीतून त्यांचे वास्तूश्री कॉम्पलेक्स समोरून तिघांचे अपहरण करण्यात आले.
सुटकेसाठी मागितली 50 लाखांची खंडणी
यानंतर अपहरण झालेल्यांपैकी एकाने व्हॉट्सअपद्वारे व्हिडीओ कॉल करुन तक्रारदाराला याची माहिती दिली. तसेच मारहाण होत असल्याचे देखील दाखवले. त्यानंतर तिघांना सोडायचे असेल तर पुण्यातील एम. जी. रस्ता येथील एका अंगडीयाकडे 50 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी आरोपींनी केली. त्यानंतर तक्रारदाराने शुक्रवारी सकाळी पोलिसांना याची माहिती दिली. अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांवरुन आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपी पसार झाले. यावेळी आरोपाींच्या ताब्यातून एक फॉर्च्युनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाड्या जप्त केल्या.