कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri-Chinchwad Police) दरोडा विरोधी पथकाने जमीन खरेदी - विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या हत्येचा (Crime News) कट उधळून लावला आहे. सुपारी देणाऱ्या चार्टर्ड अकाउंट मित्रासह तीन जणांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. व्यावसायिक राजू माळी यांच्या हत्येसाठी त्यांचाच मित्र विवेक लाहोटी याने सुधीर परदेशी याला पन्नास लाख रुपयांची सुपारी महिलेमार्फत दिली होती. दरोडा विरोधी पथकाने आरोपीकडून तीन पिस्तुल आणि 40 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक लाहोटी हे जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा मित्र राजू माळी हा त्यांचा भागीदार होता. परंतु, राजू माळी यांच्यासोबत झालेल्या व्यवहारातून गैरसमजूत निर्माण झाली होती. याचा राग विवेक लाहोटी यांच्या मनात होता. त्यानंतर लाहोटी यांनी सुधीर परदेशी यास 50 लाख रुपयांची सुपारी देऊन राजू माळी यांची हत्या करण्याचा कट रचला होता. दर शनिवारी आणि रविवारी राजू माळी हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बांधकाम साईट येथे भेट देतात, तिथेच ते मुक्काम करतात. ही बाब हेरून त्याच ठिकाणी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. आरोपींनी तशी टेहाळणी देखील केली होती. मात्र, त्या अगोदरच दरोडा विरोधी पथकाने राजू माळी यांच्या हत्येचा कट उधळून लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, सुमित देवकर, गणेश हिंगे, रासकर यांच्या पथकाने केली आहे.


बंगळुरुमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची हत्या


कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. बंगळुरुतल्या अॅरोनिक्स इंटरनेट या टेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका माजी कर्मचाऱ्यानेच कार्यालयात घुसून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वेणू कुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर माजी कर्मचाऱ्याने तिथून पळ काढला होता. बंगळुरु पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


दरम्यान, आरोपी फेलिक्सने याआधी फेलिक्स अॅरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम केले होते आणि कंपनीचा राजीनामा दिला होता. फेलिक्सने स्वतःची कंपनी स्थापन केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फणींद्र त्याच्या नवीन कंपनीच्या कामात अडथळा आणत होता, त्यामुळे त्याने फेलिक्सने दोघांची हत्या केली.