4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत
Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्या थराला याचा काही नेम नाही. वेगवेगळ्या रिल्सच्या (Reels) माध्यमातून नेटकरी सध्या प्रसिद्ध मिळवत आहे. अशातच पुण्यात (Pune Crime) अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं घालून रातोरात प्रसिद्ध मिळवलेल्या एका रिल्स स्टारकडून खंडणी उकळण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रिल्स स्टारच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Pune Crime) याप्रकरणात एका विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
इंन्स्टाग्रामवर गोल्डन बॉय या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका रिल्स स्टारला स्वतःला चोर म्हणून घेणाऱ्या एकाने चांगलाच गंडा घातला आहे. तक्रारदार रील्स स्टारची 18 तोळे वजनाची सोन्याची चैन घालण्यासाठी आरोपीने घेतली होती. मात्र ही चैन परत मागितली असता आरोपीने तू खूप मोठा रिल्सस्टार आहेस ना, कशी तुझी सगळी हवा काढतो असे म्हणून त्याच्याकडूनच तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. अधिक पैशांची मागणी होऊ लागल्याने रिल्स स्टारने शेवटी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन येथील शिंदवणे येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. याप्रकरणी महेश उर्फ मल्लाप्पा साहेबांना होस्मानी (शिंदवणे, ता. हवेली, जी, पुणे) याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिल्स स्टार धर्मेंद्र उर्फ मोनू बाळासाहेब बडेकर (वय 30) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
फिर्यादी धर्मेंद्र बडेकर हे रील्स स्टार आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे साडेचार लाख फॉलोवर्स आहेत. तर आरोपी महेश हा त्यांच्या ओळखीचा आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने धर्मेंद्र यांची 18 तोळे वजनाची सोन्याची चैन घालण्यासाठी घेतली होती. काही दिवसांनी धर्मेंद्र यांनी ही चैन परत मागितली. मात्र आरोपीने चैन परत करण्याऐवजी फिर्यादीकडेच तीन लाखांची खंडणी मागितली.
आरोपीने धर्मेंद्रला शिवीगाळ देखील केली होती. "मी अट्टल चोर असून चोरी केलेले सर्व सोने तुला आणून देत असतो असे कोंढवा पोलिसांना सांगेल. तू खूप मोठा रिल स्टार आहेस ना, आता बघ मी कशी तुझी सगळी हवा काढतो. तू मला तीन लाख रुपये दे, नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेल. चोरी केलेले सोने तुला देतो असे सांगून सोशल मीडियावर तुझी बदनामी करेल. मग तुझ्या फॉलोअर्सला कळेल तू कसा गोल्डन बॉय झाला आहेस," असे सांगून आरोपीने धर्मेंद्रला धमकावले होते.
दरम्यान, फिर्यादी धर्मेंद्रने खंडणीच्या रकमेतील दोन लाख रुपये आरोपीला दिले सुद्धा होते. मात्र आरोपीने आणखी पैशाची मागणी करत सोशल मीडियावर फिर्यादीची बदनामी केली. त्यानंतर धर्मेंद्र यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.