Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वादातून होणाऱ्या गुन्हेगारींच्या घटनांमध्ये पुण्यात (Pune News) मोठी वाढ झाली आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असताना दुसरीकडे सक्रीय टोळ्यांकडून दहशत माजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. अनेकदा वैयक्तित कारणांवरुनही गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत  आहेत. गुरुवारी मध्यरात्री असाच काहीसा प्रकार पुण्याच्या आंबेगावमध्ये (ambegaon) घडला आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राला संपवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्री घडलेल्या हत्येनंतर पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांसाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल दांगड असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी सुशांत आरुडे याने हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी सुशांतने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.


गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता आरोपी सुशांतने पैशांवरुन वाद झाल्यानंतर राहुलच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत राहुलचा मृत्यू झाला. राहुलच्या हत्येनंतर सुशांतने तिथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालय.


कशावरुन झाला वाद?


मृत्यू झालेल्या राहुल दांगट याचा शेतीचा व्यवसाय होता.  राहुला आणि सुशांत आरुडे या दोघांमध्ये पैशांच्या देवाण घेवाणीवरुन वाद झाले होते. यावरुनच गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस होता. गुरुवारी मध्यरात्री आरोपी सुशांतने भारती विद्यापीठच्या मागे पॉकेट कॉर्नर येथे राहणाऱ्या राहुल दांगट याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, आरोपीने राहुलच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यानंतर नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळुन खून केला. 


"राहुल दांगट आणि सुशांत आरोडे यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद होते. त्यामुळे सुशांतने राहुल दांगट याचा निर्घृण खून केला आहे. मात्र याशिवाय खुनामागे आणखी काही कारण आहे का? याची माहिती आरोपीकडून चौकशी करुन घेतली जात आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे," अशी माहिती भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट दिली.